वसईतून अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या एका आरोपीने वसई पोलिसांना चांगलेच झुंजवले आहे. त्याच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांना तिसऱ्या वेळी रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
वसईच्या कोळीवाडा येथे राहणाऱ्या फौजिया शेख (१६) या मुलीचे २१ नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. त्याच भागात राहणाऱ्या सद्दाम अन्सारी नावाच्या तरुणाने तिला फूस लावून पळवून नेले होते. सुरुवातीला हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती; परंतु मुलीच्या आईने- फरजाना शेख यांनी मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. त्यासाठी तिने वसई पोलीस ठाण्याच्या पायरीवर आठवडाभर आंदोलनही केले होते. दोन वेळा पोलीस अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचले होते, पण त्या वेळी तो निसटला होता. या वेळी पुन्हा पोलिसांनी सद्दाम याचा माग काढला असता तो गोरखपूर येथे आढळून आला. त्यामुळे या वेळी आपण त्याला पकडू, असा पोलिसांना विश्वास होता.
पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले, पण पोलीस येण्याच्या आतच तो तेथून पळून जाण्यास यशस्वी ठरला. तिसऱ्या वेळीसुद्धा त्याने पोलिसांना गंडवले. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच माझ्या मुलीचा शोध लागत नसल्याचे फरजाना शेख यांनी सांगितले. अद्याप माझ्या मुलीशी संपर्क झाला नसल्याने सतत चिंता लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपांचा इन्कार
आमचे पथक या आरोपीच्या मागावर आहे. लवकरच त्याला पकडले जाईल, असा विश्वास वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या दिरंगाईमुळे किंवा निष्क्रियपणामुळे आरोपी निसटल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला.