वसई किनारपट्टीवर सायरन, संरक्षक जाळी बसवलीच नाही; निधीची तरतूद असूनही असुरक्षा
वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी संरक्षक जाळ्या, सायरन लावण्याची तरदूत असूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, तसेच सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आलेले नाही. उच्च न्यायालयानेही याबाबत तीव्र नापंसती व्यक्त करून सरकारवर टीका केली आहे. वसई-विरारच्या समुद्र किनाऱ्यावर वाढत्या दुर्घटना होत असूनही सुरेक्षबाबात काहीच उपाययोजना होत नसल्याबद्दल नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे.
वसई तालुक्यात शेकडो पर्यटक समुद्रकिनारी पर्यटनास येत असतात. मात्र समुद्रात बुडून मृत्युमुखी होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत वसई तालुक्यातील समुद्रात आणि नदीत बुडून तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक प्रमाण हे अल्पवयीन तरुणांचे आहे. या वाढत्या दुर्घटनेबदद्दल चिंता व्यक्त होत असताना प्रशासनाचा हलगर्जीपणाही समोर आला आहे. या समुद्र किनाऱ्यांवर संरक्षक जाळी, सायरन आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्याला मंजुरी देण्यात आलेली होती. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत उच्च न्यायालायाने नुकतेच राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहे. समुद्र किनाऱ्यावंर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी ८ सप्टेंबर २०१५ मध्ये अध्यादेश काढण्याता आलेला होता. त्यात या उपायांचा समावेश होता. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे पुन्हा ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. पालघरसह वसईच्या समुद्र किनाऱ्यांवर संरक्षक जाळी, सुरक्षा रक्षक आणि सायरन आदीं बाबींची अंमलबजाणी करण्याची निधीची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र ती झाली नसल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वसई-विरार मध्ये दुर्घटना घडत असताना प्रशासन अध्यादेशाचे पालन करत नाही. मग हा निधी जातो कुठे? न्यायालयाला नाराजी व्यक्त करावी लागते ही शोकांतिका आहे.
– विलास चोरघे, सामाजिक कार्यकर्ते
