scorecardresearch

कल्याण ते ठाणे, वसई जलमार्गाला मंजुरी ; उल्हास नदीतून वसई खाडीमार्गे प्रवासी वाहतूक सुविधा,

रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आठ वर्षांपूर्वी घेतला होता

alt text boat rout

महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या माध्यमातून लवकरच कामांना सुरुवात

जयेश सामंत-भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण :  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पातील कल्याण-डोंबिवली ते ठाणे-वसई जलमार्गाला विविध पर्यावरण प्राधिकरणांची मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पाच्या उभारणीतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतून पालघर जिल्ह्यातील वसई खाडीदरम्यान हा जलमार्ग प्रस्तावित आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या माध्यमातून लवकरच या प्रकल्पाच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई महानगर क्षेत्रातील शहरे जलमार्गाने जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याअंतर्गत महाराष्ट्र सागरी महामंडळाने दाखल केलेल्या कल्याण-वसई जलमार्गाच्या प्रस्तावावर महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चेअंती मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पांमधील डोंबिवली, ठाणे, मिरा-भाईंदर ते वसई भाग जल वाहतुकीने जोडला तर रस्ते, रेल्वे वाहतुकीवर येणारा ताण कमी होईल. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सागरी महामंडळाने जलतज्ज्ञांकडून कल्याण-वसई जलमार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाला महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, सागरी किनारा नियम विभाग यांच्या आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत.

जलमार्ग उभारताना खाडी किनारच्या जैवविविधतेला धोका पोहचणार नाही याची काळजी घेण्याचे कठोर निर्देश पर्यावरण प्राधिकरणांनी सागरी महामंडळाला दिले आहेत. खाडी किनारी काही ठिकाणी कामे करताना उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 

जेट्टीची उभारणी

कोलशेत (ठाणे), जेसल पार्क (मिरा-भाईंदर) खाडी किनारी पाणतळ(जेट्टी), स्थानक इमारत, वाहनतळ, वळण मार्ग  उभारण्यात येणार आहेत. जलवाहतुकीसाठी पर्यावरण पूरक इंधन वापरणे, खारफुटीला धोका होणार नाही अशा पद्धतीने बांधकाम करणे, भरतीचे पाणी अडणार नाही यासाठी जल खांबांवर पाणतळ बांधणे अशा सूचना प्राधिकरणाने केल्या आहेत.

डोंबिवलीतही थांबा

ठाणे महापालिकेने पाच वर्षांपूर्वी या जलमार्गासाठी एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये डोंबिवलीजवळ खाडीची खोली कमी असल्याने तेथून जलमार्ग नेणे शक्य नसल्याचे म्हटले होते. डोंबिवली खाडीची खोली ५० मीटर करण्यासाठी ८० कोटींचा खर्च येणार होता. मात्र, खर्चाच्या मुद्दय़ावर तो प्रस्ताव लालफितीत अडकला होता. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यानंतर नवीन प्रस्तावात डोंबिवलीला थांबा देण्यात आला आहे.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

* राष्ट्रीय जल महामार्ग पाचअंतर्गत उभारणी.

* कल्याण, डोंबिवली,ठाणे, कोलशेत, घोडबंदर, गायमुख, मिरा-भाईंदर, वसई या ठिकाणी थांबे.

जलवाहतुकीने रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल. मध्य-पश्चिम रेल्वे भाग जल वाहतुकीने जोडल्याने डोंबिवली, बदलापूर, कल्याण, ठाणे भागातील प्रवासी वसई, विरार, डहाणू परिसरात योग्य वेळेत पोहोचेल. या कामासाठी एक हजार कोटी निधी प्रस्तावित आहे.   – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasai thane kalyan waterway project sanction by environmental authorities zws