वसई विजयोत्सवावरून रण

चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला हस्तगत केला.

Vasai Vijayotsav
आमची वसई या संस्थेचे धनंजय वैद्य यांनी या उत्सवाचे जोरदार समर्थन केले आहे.

बंदी घालण्याच्या मागणीचे तीव्र पडसाद; महापौरांची सामंजस्याची भूमिका

धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याने वसई विजयोत्सवावर बंदी घालण्याची मागणी काही संघटनांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. विशिष्ट समूहाचे गुणगाण करणारे कुठलेच उत्सव साजरे करू नयेत, केवळ स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्ट हाच विजयोत्सव दिन असावा, अशी भूमिक समाजशुद्ध अभियानाने घेतली आहे, तर सामंजस्याची भूमिका घेत वसई-विरारच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांनी हा उत्सव कुणाच्या धार्मिक भावना भडकावणार नसून सर्वाना घेऊन तो साजरा करणार असल्याचे सांगितले.

चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला हस्तगत केला. या ऐतिहासिक घटनेनिमित्त गेल्या पाच वर्षांपासून वसईच्या किल्ल्यावर वसई विजयोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा या उत्सवाच्या आडून पोर्तुगीजांची प्रतिमा मलिन करण्यात येत असून ख्रिस्ती मिशनऱ्यांची काही घटकांकडून बदनामी केली जात आहे, असा आरोप काही ख्रिस्ती संघटनांनी केला आहे. त्यामुळे या उत्सवावर बंदी घालण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद गेल्या दोन दिवसांपासून वसईत उमटले आहेत. समाजमाध्यमांवरही त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

इतिहासात अनेक लढाया झाल्या. त्या उत्सव म्हणून साजरा केल्या तर समाजातील एक गट दुखावेल आणि वातावरण दूषित होईल, त्यामुळे असे उत्सव साजरे करू नयेत, अशी भूमिका समाजशुद्ध अभियानाचे फादर मायकल जी. यांनी व्यक्त केली आहे. केवळ १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हाच विजयी उत्सव म्हणून साजरा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्ही आमची भूमिका पालिकेपुढे मांडली आहे. इतिहासाचे विपर्यस्त विकृतीकरण केले जाऊ  नये, अशी अपेक्षा त्यांनी केली.

हरित वसईचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी उत्सवाला पाठिंबा दिला आहे, मात्र उत्सवांच्या आड पोर्तुगीज आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांची बदनामी करणारे साहित्य पसरवले जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वसईत शंकराचार्याच्या प्राचीन मंदिरासह शेकडो मंदिरे आहेत. पोर्तुगीज जर अत्याचारी असते तर ही मंदिरे आजवर अबाधित राहिली नसती याकडे त्यांनी लक्ष वेधले. बळजबरीने धर्मातर केले नाही, असेही ते म्हणाले. पोर्तुगीजांविरोधात लढताना अनेक ख्रिस्ती लोकांनी बलिदान दिल्याचेही ते म्हणाले.

आमची वसई या संस्थेचे धनंजय वैद्य यांनी या उत्सवाचे जोरदार समर्थन केले आहे. हा वसईचा स्वाभिमान आहे. चिमाजी आप्पांनी विजय मिळवला, त्या इतिहासाचे स्मरण करण्यात काय गैर आहे, असे सांगून त्यांनी हा उत्सव साजरा करायलाच हवा, असे सांगितले.

सर्वाना सोबत घेऊन उत्सव साजरा- महापौर

महापौर प्रवीणा ठाकूर यांनी वसईकरांना कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सर्वधर्मीयांना घेऊन हा उत्सव साजरा केला जातो. पालिकेने कुठल्याही धर्म आणि समुदायावर टीका केली नाही. जे अपप्रचार करीत असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या. यापूर्वीही वसईतील ख्रिस्ती जनता या उत्सवात सहभागी झाली होती आणि यापुढेही होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

सरकारी खर्चाने उत्सव होत असतील तर कुठल्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ  नयेत, असा शासनाचा अध्यादेश आहे. या उत्सवामुळे आमच्या धार्मिक भावना आणि स्वाभिमान दुखावला गेल्याचे अ‍ॅड. जिमी घोन्साल्विस यांनी सांगितले असून याविरोधात ते जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vasai vijayotsav will celebrate say mayor pravina thakur