scorecardresearch

शहरबात : सूर्याचे पाणी आणि पालिकेसमोरील आव्हाने

अतिरिक्त पाणी आल्यावर नवीन नळजोडण्या द्यायचे काम सुरू होईल.

surya-dam
सूर्या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील शंभर दशलक्ष लिटर पाणी लवकरच शहराला मिळणार आहे.

वसई-विरार शहराला येत्या काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त शंभर दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. शहरातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे; परंतु पाणीवाटपाचे नियोजन करणे, पाण्याची गळती रोखणे, जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकाराला आळा घालणे अशा अनेक आव्हानांचा पालिकेला सामना करावा लागणार आहे.

वसई-विरार शहराचा पाणीप्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. सूर्या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील शंभर दशलक्ष लिटर पाणी लवकरच शहराला मिळणार आहे. यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. हे अतिरिक्त पाणी शहरात येणार असले तरी प्रशासनासमोर अनेक आव्हाने आहेत. पाणीपुरवठा सर्वाना समान होणे, पाण्याची गळती आणि चोरी रोखणे ही आव्हाने आहेतच; पण सूर्या योजनेच्या जलवाहिनी फुटण्याचे जे ग्रहण गेल्या काही महिन्यांपासून लागलेले आहे ते रोखणे आवश्यक आहे. पाणी येणार याच्या आनंदात या नव्या आव्हानांचे शिवधनुष्य 8पेलावे लागणार आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २० लाखांहून अधिक आहे. सध्या शहराला पापडखिंड, उसगाव, पेल्हार आणि सूर्या धरणातून १३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. शहराची ही गरज ओळखून सूर्या धरणाच्या तिसऱ्या टप्प्याची योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना ३०० कोटी रुपयांची योजना आहे. ही पाणीपुरवठा योजना पालिका राबवत आहे. त्यासाठी नगरोत्थानमधून ५० टक्के निधी मिळाला आहे. सुमारे ३०० कोटींच्या या योजनेतून वसई-विरारमधील रहिवाशांना सूर्या धरणातून पाणी मिळणार आहे. सूर्या धरणाच्या कवडास बंधरातील अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर पाणी दुक्टण येथील जलशुद्धीकरणात प्रकल्पात आणून तेथून काशिदकोपर येथील जलकुंभात आणले जाणार आहे. त्यानंतर शहरात वितरित केले जाणार आहे. २०१४ मध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. याच योजनेच्या आधारे पाणी देणार, असे आश्वासन देत महापालिकेच्या निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. मात्र सातत्याने या योजनेसाठी अडथळे येत आहेत. १ मार्च २०१५ मध्ये या योजनेतून १०० दशलक्ष लिटर पाणी येणे अपेक्षित होते; परंतु सुरुवातीला वनखात्याने हरकत घेतली. वनखात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविताच हरित लवादाने आक्षेप घेतला होता; परंतु काही क्षेत्र हे संरक्षित वनेअंतर्गत राखीव असल्याने हरित लवादाने त्याला आक्षेप घेतल्याने काम रखडले होते. एका प्रकरणातील याचिकाकर्त्यां शोभा फडणवीस यांना लवादाने पक्षकार म्हणून घेतले होते. लवादापुढे झालेल्या सुनावणीनंतर कोणताच आक्षेप नसल्याने वनखात्याने तसेच फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर लवादाने वनखात्याला ना हरकतीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. हे प्रतिज्ञापत्र मंत्रालयात सादर करून शासनाची मंजुरी घेण्यात आली. लवादाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर वनखात्याचा आडमुठेपणा या योजनेच्या मार्गातील अडथळा ठरला होता. या योजनेतील १९ किलोमीटरच्या जलवाहिन्या वनखात्याच्या जागेतून जाणार असल्याने वनखात्याने आक्षेप घेतला होता. पालिका प्रशासनाने प्रयत्न करून वनखात्याची परवानगी मिळवली होती. या १९ किलोमीटर मार्गात ११०० झाडे होती. या मोबदल्यात वनखात्याला महाडजवळील पोलादपूर येथे जागा देण्यात आली होती; परंतु वनखात्याने १५ एकर जागेचा सातबारा पूर्ण नावावर झाल्याशिवाय या मार्गातील झाडे कापणार नाही अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. पालिकने त्यासाठी वनखात्याला जागेची रक्कम तसेच झाडे कापण्यासाठी रक्कम असे मिळून १ कोटी रुपये यापूर्वीच दिले होते. १५ एकर जागेपैकी ४० गुंठे जागा वगळता सर्व जागेचा सातबारा हा वनखात्याच्या नावे झालेला होता; परंतु संपूर्ण जमिनीचा सातबारा नावावर झाल्याशिवाय झाडे कापणार नाही अशी आडमुठेपणाची भूमिका वनखात्याने घेतली होती. सव्‍‌र्हर डाऊन असल्याने ऑनलाइन सातबारा उतारे नावावर होत नव्हते. ती अडचण होती. अखेर सर्व सातबारे उतारे वनखात्याच्या नावाने झाले आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले. आता जलवाहिनीच्या मार्गात मोठा दगड लागल्याने तो युद्धपातळीवर तोडण्याचे काम सुरू आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर त्यांचे सहकारी तसेच पालिका आयुक्त सतीश लोखंड आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी चांगला पाठपुरावा करून त्या अडचणी सोडविण्यात यश आले आहे.

अतिरिक्त पाणी आल्यावर नवीन नळजोडण्या द्यायचे काम सुरू होईल. यापूर्वी बेकायदेशीर नळजोडण्या दिल्याप्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. असे प्रकार पुन्हा सुरू होतील. यापुढील काळातही अशा गैरकृत्यांवर लक्ष ठेवून आळा घालावा लागणार आहे. वसई पूर्वेच्या कामण आणि परिसरातील अनेक गावे पालिकेत आहेत. चार वर्षांपूर्वी जलकुंभ बांधले, पण गावात पाणी आले नाही. त्यामुळे त्यांना मोठी पाणीटंचाई भेडसावते. अशा पाण्यापासून वंचित गावांना पाणीपुरवठा करण्याचे, पाण्याचे समान नियोजन करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर राहणार आहे.

गळती, जलवाहिन्या फुटण्याचे वाढते प्रमाण

वसई-विरार शहराच्या पाणीपुरवठय़ाला ग्रहण लागले असून गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी जलवाहिन्या फुटत आहेत. डिसेंबरच्या एकाच महिन्यात चौथ्यांदा जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. एकदा कंटनेर जलवाहिन्याला धडकून जलवाहिनी फुटली होती, तर एकदा जलवाहिनी २२ फूट आत जमिनीत रुतल्याने पाणीपुरवठा खंडित झाला होता. नवीन वर्षांतही तीन महिन्यांत तीन वेळा जलवाहिनी विविध कारणांमुळे फुटली होती. सूर्याचा पाणीपुरवठा बंद झाल्याने सगळी भिस्त ही उसगाव आणि पेल्हारवर असते; पण त्याचे ३० दशलक्ष लिटर्स पाणी अत्यंत कमी असल्याने नागरिकांचे हाल होत असतात. यामुळे अशा घटना रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. पाणीपुरवठा विभागात अतिरिक्त अभियंत्यांची गरज आहे.

उन्हाळ्याचे चटके आणि वसईच्या अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असताना मुख्य जलवाहिनीला गळती असल्याचे समोर आले आहे. नालासोपारा येथील संतोष भुवन ते पेल्हार मार्गावर जलवाहिनीला गळती झाल्याने लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. पाइपलाइनवर व्हॉल्व्ह असतात. त्यातील अनेक व्हॉल्व्हवर गळती झाली आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती सुरू असते. नालासोपाऱ्याच्या संतोष भुवन, बिलालपाडा, राशीद कंपाऊंड, श्रीराम नगर या परिसरांतील अनेक भागांत आजही पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे; पण याच ठिकाणी असलेल्या जलवाहिनीला गळती झाली आहे. या गळती झालेल्या व्हॉल्व्हमधून पाणी भरण्यासाठी रात्रंदिवस रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात. हीच परिस्थिती वसई स्टेशन ते महामार्गावरील रस्त्यालगत पाहावयास मिळते. जलवाहिनीवरील ही गळती नवीन नाही. या ठिकाणी पाणी भरण्यापासून ते कपडे, गाडय़ा धुण्यापर्यंत लोक त्याचा वापर करतात.

पाण्याच्या कमतरतेमुळे पालिकेने शहराला नवीन नळजोडण्या दिलेल्या नाहीत; पण जर ही गळती रोखली तर पाण्याच्या क्षमतेत वाढ होईल. अशा विविध ठिकाणच्या गळती रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. मागील वर्षी जलवाहिनी फोडून त्यातून टँकरमाफिया पाण्याची चोरी करत असल्याचे समोर आले होते. अशा चोरीच्या घटनांवर अंकुश घालून कठोर कारवाई करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-04-2017 at 02:36 IST