पालिकेच्या तिजोरीला अनास्थेमुळे ओढ!

पालिकेचा अनागोंदी आणि उदासिन कारभार पुन्हा समोर आला आहे.

लोकवस्ती वाढत असतानाही मालमत्ता कराचे लक्ष्य कमी; करवसुलीतही अपयश

वसई-विरार शहरात झपाटय़ाने नागरी आणि औद्योगिक वस्तींचा विकास होत असताना मालमत्ता कराचे अपेक्षित उत्पन्न महापालिकेने आठ कोटी रुपयांनी कमी दाखवले आहे. चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी १५८ कोटी रुपये अपेक्षित होते, तर पुढील आर्थिक वर्षांत महापालिकेने आठ कोटींनी कमी म्हणजे १५० कोटी मालमत्ता कराचे उत्पन्न दाखवले आहे. त्यातही चालू वर्षांतील मालमत्ता कराची वसुली अवघी ५२ टक्के झाली असून अद्याप १३६ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली बाकी आहे. यामुळे पालिकेचा अनागोंदी आणि उदासिन कारभार पुन्हा समोर आला आहे.

मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मानले जाते. मात्र मालमत्ता कराच्या वसुलीबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पालिकेने चालू आर्थिक वर्षांत १५८ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु २०१८-१९ या आर्थिक वर्षांत पालिकेने हे अपेक्षित उत्पन्न आठ कोटी रुपयांनी कमी करून १५० कोटी रुपये केले आहे. शहरात झपाटय़ाने नागरिकीकरण होत आहे. दररोज नवनव्या रहिवासी आणि व्यावसायिक इमारती उभ्या राहात आहे, तरीही पालिकेने अपेक्षित उत्पन्न का घटवले, असा सवाल शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सुदेश चौधरी यांनीही सभागृहात मालमत्ता कराच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले आणि हा चिंताजनक प्रकार असल्याचे सांगितले. कररचनेचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली.

हजारो मालमत्तांचे करनिर्धारणच नाही

महापालिकेकडे शहरातील ७ लाख १७ हजार मालमत्ताधारकांची नोंद आहे. या ७ लाखांपैकी ४ लाख ३३ हजार अधिकृत तर २ लाख ८३ हजार अनधिकृत मालमत्ताधारक आहेत. जीआयएस मॅपिंग सर्वेक्षणानुसार शहरात ६ लाख ४९ हजार मालमत्ता असून त्यांचे करनिर्धारण झालेले नाही. मालमत्ता करांची मोजणी करण्यासाठी महापालिकेने बाह्य यंत्रणेकडून  खासगी कंपनीला २०१२ मध्ये काम दिले होते. या कामासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च झाला, मात्र नव्या मालमत्तांची नोंद झाली नाही.

करवसुलीही अवघी ५२ टक्के

चालू आर्थिक वर्षांत पालिकेच्या मालमत्ता कराचे अपेक्षित उत्पन्न १५८ कोटी तर मागील थकबाकी १२६ कोटी असे धरून २८५ कोटी रुपये येणे बाकी होते, परंतु १५ मार्चपर्यंत पालिकेने केवळ ५२ टक्के  वसुली केली. अद्याप १३६ कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली झालेलीच नाही. संपूर्ण पालिका क्षेत्रातील निर्लेखित मालमत्तांची यादी आणि त्यापासून वसूल न होणारी रक्कम ४२ कोटी एकाकी आहे. एकूण निर्लेखित मालमत्ता २७ हजार ६८५ आहेत. म्हणजेच २८५ कोटींच्या मागणीतून ४२ कोटींची वसुली केलीच जात नाही, असेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

नगरसेवकांत शाब्दिक चकमक

शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांचे अर्थसंकल्पावर भाषण सुरू असताना सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक गप्पा मारत होते. त्यामुळे भाषणात व्यत्यय येत होता. तेव्हा चेंदवणकर यांनी गप्प रहा आणि ज्यांना बोलायचेआहे, त्यांनी बाजूच्या केबीनमध्ये जा, असे सांगितले. त्यावर नगरसेवक पंकज ठाकूर यांनी तुम्ही आम्हाला जा, असे सांगणाऱ्या कोण, असे सांगत हरकत घेतली आणि दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vasai virar municipal corporation property tax

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या