बसतुटवडय़ाचा तडाखा

प्रवाशांना सुसह्य़ ठरेल अशी रचना असलेल्या बसगाडय़ांची मागणी पालिकेने अशोक लेलॅण्ड कंपनीकडे केली आहे,

(संग्रहित छायाचित्र)

प्रवासी हैराण; पालिका-कंपनीच्या वादात ७० बसगाडय़ा रखडल्या

वसई : वसई-विरारमधील एसटी सेवा बंद करताना कोणताही खंड पडता  परिवहन सेवा सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेने  दिले होते. मात्र गेले काही दिवस पालिका आणि बस कंपनी यांच्या वादात वसई-विरारकरांच्या सेवेसाठी येऊ घातलेल्या परिवहन खात्यात अद्यापही ७० बसगाडय़ांचा तुटवडा असल्याने पालिकेची ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे.

प्रवाशांना सुसह्य़ ठरेल अशी रचना असलेल्या बसगाडय़ांची मागणी पालिकेने अशोक लेलॅण्ड कंपनीकडे केली आहे, मात्र त्या देण्यास ‘लेलॅण्ड’ने  नकार दर्शवला आहे. बसगाडय़ांच्या तुटवडय़ामुळे परिवहन सेवेवर परिणाम होत आहे.

वसई-विरार पालिकेची परिवहन सेवा २०१२ साली सुरू झाली होती. मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी ठेकेदारामार्फत ही सेवा राबविण्यात येत आहे. परिवहन सेवा सुरू करताना पहिल्या तीन वर्षांत ठेकेदाराशी ३०० बसगाडय़ा पुरविण्यासंदर्भात करार झाला होता.  ठेकेदाराने ११९ बसगाडय़ा सुरू केल्या आहेत. तर पालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयुआरएम) ३० बसगाडय़ा दिल्या होत्या. ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत  पालिकेला ३७६ बसगाडय़ा मंजूर झाल्या होत्या. त्यामुळे पालिकेने  ठेकेदाराला अतिरिक्त बस घेऊ  नये असे सांगितले. दरम्यान, त्यात सुधारणा होऊन ३७६ ऐवजी २२० बसगाडय़ा पालिकेला मिळणार होत्या. त्यातील पालिकेच्या हिश्श्यापोटी साडेचार कोटी रुपयेही जमा करण्यात आले होते.

२०१५ साली केंद्रात नवे सरकार आल्यानंतर या निधीत कपात करण्यात आली आणि २२० ऐवजी १०० बसगाडय़ा देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र ‘अशोक लेलॅण्ड’ने पालिकेने  सूचविलेल्या बसगाडय़ा अद्याप दिलेल्या नाहीत.

आम्ही कंपनीला जनतेच्या सोयीसाठी प्रशस्त आणि वेगळ्या रचना असलेल्या बसगाडय़ा पुरविण्यास सांगितल्या होत्या. परंतु कंपनी त्या देण्यास तयार नाही. यापूर्वी ‘अशोक लेलॅण्ड’ने ज्या बसगाडय़ा दिल्या होत्या. त्यात अनेक तांत्रिक दोष होते. ते आम्ही दुरूस्त करून घेतले होते. त्यामुळे यावेळी आम्हाला आम्ही सूचविलेल्या रचनेच्या बसगाडय़ा हव्या आहेत, असे परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी सांगितले.

भगीरथी ट्रान्सपोर्ट कंपनी या ठेकादाराच्या ११९ बसगाडय़ा  शहरातील रस्त्यावर आहेत. त्यात २५ आसन असलेल्या ७४ लहान बसगाडय़ा तर ३७ आसन असलेल्या ४५ बसगाडय़ा आहेत. पालिकेच्या ‘जेएनएनयूआरएम’च्या माध्यमातून आलेल्या ३० बसगाडय़ा आहेत. त्यात ‘अशोक लेलॅण्ड’च्या ३० आणि टाटा कंपनीच्या १० बस आहेत. प्रत्येक मोठय़ा बसगाडय़ांची किंमत ५२ लाखांच्या तर छोटय़ा बसची किंमत ३२ लाख एवढी आहे.

‘लेलॅण्ड’च्या बसगाडय़ांमध्ये दोष

पालिकेच्या परिवहन विभागाने अशोक ‘लेलॅण्ड’ कंपनीकडून २० बसगाडय़ा घेतल्या होत्या. त्यात अनेक तांत्रिक दोष होते. पालिकेने त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेकडे   (सीआयआरटी) तक्रार दाखल केली होती. कंपनीचे नऊ कोटी रुपयांची रक्कम थांबवली होती. सीआयआरटीने पाहणी करून आवश्यक ते बदल सूचवले आणि नव्याने या बसगाडय़ांची रचना करण्यात आल्यानंतर पालिकेने रक्कम दिली होती.

बसनामा

* पालिका आणि कंपनीच्या या वादामुळे या ७० बसगाडय़ा परिवहनच्या ताफ्यात येऊ  शकलेल्या नाहीत. त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

* शहरातील अनेक भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाडय़ा नाहीत. एसटी बंद झाल्याने गावातील अनेक मार्गावर बसगाडय़ांची आवश्यकता आहे. मात्र बसगाडय़ांच्या तुटवडय़ामुळे या मार्गावर बस सुरू करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

* वसईच्या काही भागातील बस फेऱ्याही पुरेशा संख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vasai virar transport service still face shortage of 70 buses

ताज्या बातम्या