फ्लॉवर, कोथिंबीर, मटार, मिरची शंभरीपार

दिवाळसण तोंडावर असताना धान्याच्या घाऊक बाजारात एकीकडे मंदीचे सावट असताना लहरी हवामानामुळे भाज्यांचे दर मात्र आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाच्या माऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी भाज्यांची आवक घटून दरांत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तर फ्लॉवर, कोंथिबीर, मटार, मिरची यांच्या दरांनी शंभरी गाठली आहे.

नाशिक, पुणे येथे अतिवृष्टी झाल्याने शेतातील भाजीपीक खराब झाले. विशेषत: फ्लॉवर, मटार, मिरची, कोंथिबीर यासारख्या भाज्यांना या लहरी हवामानाचा मोठा फटका बसला आहे. या भाज्या महाग झाल्याने भेंडी, तोंडली, वांगी यासारख्या भाज्यांना सध्या मोठी मागणी आहे, अशी माहिती ठाण्यातील किरकोळ भाजी विक्रेते विवेक भुजबळ यांनी दिली. एरवी किलोमागे दहा रुपयांच्या आसपास असणाऱ्या या फळभाज्या घाऊक बाजारातही तिशीपलीकडे पोहचल्या असून किरकोळ बाजारात तर ८० ते १०० रुपयांनी विकल्या जात आहेत, अशी माहिती दर्शन म्हात्रे या विक्रेत्याने दिली. कल्याण एपीएमसीमध्ये कोबी आणि प्लॉवर या भाज्यांचे २५-३० ट्रक नाशिकवरून येत होते. सध्या मात्र १२-१५ ट्रक येत असून कोथिंबिरीच्या गाडय़ांची संख्या १२-१५ वरून सध्या फक्त तीन ते चार गाडय़ांवर आली असल्याचे एपीएमसीचे अधिकारी बी.एन देशमुख यांनी सांगितले.

आधी पडलेला पाऊस आणि आता आलेली उष्णतेची लाट यामुळे भाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मुळातच कल्याण एपीएमसी येथे नाशिकहून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाव वाढवलेले दिसून येत आहेत.

– बी. एन. देशमुख, अधिकारी, कल्याण एपीएमसी