ठाणे – उन्हाच्या तीव्रतेमुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली असून त्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

ठाणे शहरातील बाजारपेठेत वाशी, नाशिक, पुणे, सातारा अशा विविध जिल्ह्यांतून भाज्या दाखल होतात. यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे शेतमाल करपणे, पाण्याची टंचाई आणि वाहतुकीतील अडचणी यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम ठाणे तसेच उपनगरांमधील बाजारपेठांवर झाला आहे. भाज्यांची आवक घटल्याने त्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भेंडी, दोडका, कोबी, वांगी, दुधी, फरसबी, वाटाणा, पालक, मेथी या भाज्यांची आवक घटल्याचे दिसून येत आहे. फरसबीच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आधी फरसबीचे दर ६० रूपये किलो होते. आता १६० रूपये किलोने विकली जात आहे. हिरव्या मिरचीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आधी ६० रूपये किलोने विकली जाणारी मिरची आता १०० रूपये किलोने विक्री होत आहे. पालेभाज्यांच्या दरात १० ते २० रूपयांना वाढ झाली आहे. भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर बसत आहे.

वाढत्या तापमानामुळे बाजारात लिंबाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने बाजारात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळात एक नग ५ रूपयांना विकला जाणारा लिंबु आता आठ ते दहा रूपयांना विक्री केला जात आहे. शहरातील बाजारात आंध्र प्रदेश येथून लिंबाची आवक होत आहे.

वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे. तसेच ग्राहक देखील गावी गेल्याने भाज्या कमी प्रमाणात विक्री होत आहेत. यामुळे काही भाज्या खराब होतात, असे ठाण्यातील भाजी विक्रेते विनोद जैस्वाल यांनी सांगितले.

भाज्यांचे दर

भाजीआधी (₹/किलो)आता (₹/किलो)
टोमॅटो३० – ४०५० – ६०
दोडका६०८०
कोबी८०१००
वांगी४०५०
काकडी४०६०
दुधी६०७०
फरसबी६०१६०
वाटाणा६०१००
मिरची६०१००
अद्रक८०१००
मेथी३०४० – ५०
पालक२०३० – ४०