डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकातील रुळांच्या मार्गिकेत रेल्वे ठेकेदाराने खडी आणून टाकली आहे. डांबर मिश्रित नसलेल्या या खडीवरून मोटारी, दुचाकी वाहनांची चाके जागीच फिरत आहेत. रिक्षा चालकांना प्रवासी भरलेल्या या खडी मार्गातून रिक्षा नेणे अवघड होत आहे. खडीमुळे रेल्वे मार्गात वाहन अडकून पडले, त्याचवेळी लांब पल्ल्याची एक्सप्रेस आली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वाहन चालक वर्तवत आहेत.
हेही वाचा >>> दिवाळी खरेदीची गर्दी, उमेदवारांच्या प्रचार मिरवणुकांनी कल्याण-डोंबिवली शहरे कोंडली; नागरकांमध्ये तीव्र नाराजी
मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून धावणाऱ्या वाहनंची संख्या वाढली आहे. ही वाहने मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकातून येजा करतात. या वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रेतीबंदर रेल्वे फाटका जवळील रेल्वे रुळांमधील खडी विखुरली आहे. या रुळाच्या समांतर खडी नसल्याने रुळावरून वाहने नेताना आपटत आहेत. प्रवाशांना होणारा त्रास आणि वाहन चालकांना करावी लागणारी कसरत विचारात घेऊन रेल्वेने रेतीबंदर रेल्वे फाटकातील रुळांवर कोरडी खडी आणून टाकली आहे. ही खडी डांबर मिश्रित नाही. या मोकळ्या कोरड्या खडीवरून वाहने धावत असताना वाहनाचे चाक खडीत अडकून राहते. अनेक वेळा ते जागीच गरगर फिरत राहते.
हेही वाचा >>> कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले
हा सर्वाधिक त्रास प्रवाशी भरलेल्या रिक्षा चालक आणि दुचाकी स्वारांना होत आहे. रुळाच्या मार्गात टणक रस्ता नाही. त्यामुळे दुचाकी रूळ आणि खडीच्या दरम्यान आली की दुचाकीचे चाक रूळाला घासत गरगर फिरत राहते. रूळाच्या मार्गात अडकलेली दुचाकी बाहेर काढताना दुचाकी स्वारांची दमछाक होत आहे. अवजड वाहने या मार्गातून सहज निघून जातात. पण मोटारी, दुचाकी स्वारांना या खडीचा सर्वाधिक त्रास होत आहे. रेल्वे फाटकातील रुळांवरील रस्ता हा नेहमी डांबर मिश्रित खडीचा केला जातो. यामुळे रुळावरून वाहने सहज पुढे निघून जातात. रेतीबंदर रेल्वे फाटकात डांबरी मिश्रित खडीचा वापर न केल्याने वाहनांचे टायर सतत रुळाला घासले गेल्याने रूळ नादुरुस्त होऊन अपघात होण्याची भीती जाणकार प्रवासी व्यक्त करत आहेत. याविषयी काही जागरूक प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे.