ठाणे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे; २५० वाहने उभी करण्याची सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : येथील गावदेवी भागातील भाजी मंडई इमारतीच्या तळघरात दुचाकीसाठी उभारण्यात आलेले वाहनतळ दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. तसेच या मैदानात उभारण्यात आलेल्या भूमिगत वाहनतळाचे कामही महिनाभरात पूर्ण करण्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या ठिकाणी जवळपास अडीचशे वाहने उभी करता येणार असून त्यामुळे स्थानक परिसरात बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर होण्याची चिन्हे आहेत.  ठाणे स्थानकातून मुंबई किंवा आसपासच्या उपनगरांत रेल्वेने प्रवास करणारे अनेक नागरिक घरापासून स्वत:च्या वाहनाने स्थानकापर्यंत येतात. या ठिकाणी वाहनतळासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी वा चारचाकी वाहने उभी करतात. मात्र त्यामुळे स्थानक परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊन सातत्याने कोंडी होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी गावदेवी येथील मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते.

गावदेवी येथील भाजी मंडई इमारतीच्या तळघरातील वाहनतळ यापूर्वीच खुले करण्यात आले आहे. परंतु दरवर्षी १० टक्के भाडेवाढ देणे शक्य नसल्यामुळे ठेकेदाराने दोन वर्षांपुर्वी वाहनतळाचे काम बंद केले होते. तेव्हापासून बंद असलेले वाहनतळ पुन्हा खुले करण्यासाठी पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागविण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यास सर्वसाधारण सभेने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पाला यापुर्वी विरोध झाला होता. न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते. हे प्रकरणावरील आक्षेप दूर होताच पालिकेने प्रकल्पाचे काम वेगाने सुरू केले होते. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. हे वाहनतळ ४ हजार ३३० चौरस मीटरचे आहे. त्यामध्ये १३० चाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे.  या वाहनतळमध्ये जाणारा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊन वाहनतळ नागरिकांसाठी खुले होऊ शकेल, अशी माहिती महापालिकेतील प्रशासकीय सूत्रांनी दिली

प्रकल्प काय?

  • ठाणे स्थानकालगत तसेच शहरातील अतिशय मोक्याची जागा असलेल्या गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी केली जात आहे. अशा प्रकारचा प्रकल्प एमएमआरडीएने बांद्रा-कुर्ला संकुलात उभारला आहे.
  • गावदेवी वाहनतळ उभारणीच्या  कामानंतर मैदान पूर्ववत केले जाणार आहे. या ठिकाणी वाहनतळाव्यतिरिक्त बगीचा, कारंजे, मनोरंजनाची साधने अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
  •   यामुळे मैदान बाधित होणार नाही तसेच या मैदानाचा वापर पूर्वीप्रमाणेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी करता येणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle parking month traffic jams ysh
First published on: 25-01-2022 at 00:25 IST