संगणकावरून इंटरनेटच्या माध्यमातून ‘प्रणाली ४’ कार्यान्वित

नवीन दुचाकी वा चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर वाहनाची नोंदणी आणि नवीन क्रमांक मिळवण्यासाठी वाहनमालकाला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारण्याची गरज यापुढे भासणार नाही. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहननोंदणीसाठी ऑनलाइन पद्धत सुरू केली असून त्याद्वारे वाहनमालक घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या वाहनाची नोंदणी करू शकेल. यासाठी परिवहन कार्यालयाने ‘प्रणाली ४’ (व्हर्जन फोर) कार्यान्वित केले असून त्याद्वारेच आता नोंदणीची कामे पार पडतील, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे साहाय्यक अधिकारी आय. एस. मासुमदार यांनी दिली.

आतापर्यंत नवीन वाहन घरेदी केल्यानंतर यापूर्वी नवीन वाहन खरेदी केली की वाहनमालकाला वाहन विक्रेता, उपप्रादेशिक कार्यालयात फेऱ्या मारून वाहनाचे नोंदणीकरण, मग वाहन क्रमांक मिळविणे आदी प्रक्रिया पार पाडाव्या लागत होत्या. आता एकदा वाहन खरेदी केले की, वाहन विक्रेता खरेदीदार ग्राहकाचे आधारकार्ड, अत्यावश्यक कागदपत्र घेऊन ते संगणकातील ‘प्रणाली चार’मध्ये समाविष्ट (फीड) करेल. ग्राहकाच्या आधारकार्ड क्रमांकाची ‘प्रणाली’वर नोंद झाली की, वाहन विक्रेता वाहनाचा चेसीस क्रमांक, उत्पादन क्रमांक अशी वाहनाची अद्ययावत माहिती ‘प्रणाली चार’मध्ये भरेल. वाहन विक्रेत्याने भरलेला अर्ज ऑनलाइन पद्धतीने उपप्रादेशिक कार्यालयात येईल. संबंधित वाहनाची आरटीओ अधिकारी कागदोपत्री खात्री करतील. मोटार वाहन निरीक्षक प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन एकदा वाहनाची पाहणी करून येतील. मोटार वाहन निरीक्षकाचा अहवाल आल्यानंतर, ग्राहकाला ऑन लाइन पद्धतीने ‘आरटीओ’ कार्यालयातील वाहन नोंदणीचे अत्यावश्यक शुल्क भरणा करण्यास सांगितले जाईल. ग्राहकाने वाहन नोंदणी शुल्क, कर ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यानंतर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ‘प्रणाली चार’मधील वाहनांची कागदपत्रांची अंतिम पडताळणी करतील. मग, त्या वाहनाला क्रमांक देण्यात येईल. त्याचे वाहन नोंदणीकरण पूर्ण झाल्याचा ईमेल, भ्रमणध्वनीवर संदेश ग्राहकाला त्याच्या ऑनलाइन संपर्क पत्त्यावर पाठविण्यात येईल. मेलवरून आलेल्या नोंदणी दस्तऐवजाची प्रत काढून ग्राहक आपले वाहन फिरविण्यास मोकळा होईल, असे मासुमदार यांनी सांगितले. आपली वाहन नोंदणीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याची माहिती प्रणाली चारच्या माध्यमातून ग्राहकालाही ऑनलाइन पाहता येणार आहे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

‘प्रणाली चार’ कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात सुरू झाली आहे. शासनाचे पारदर्शक कारभाराचे धोरण अमलात आणणे हाही या उपक्रमामागील उद्देश आहे. ग्राहकांना बसल्या जागी शुल्क, कर भरणा केला की ऑनलाइन पद्धतीने वाहन क्रमांक, नोंदणीकरणाची कामे करणे यामुळे शक्य होणार आहे. ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनी, संगणकावर आरटीओ कार्यालयातील त्यांची वाहन नोंदणीची माहिती उपलब्ध होणार आहे. 

– आय. एस. मासुमदार, साहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी, कल्याण