वर्सोवा जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; वाहने दीड तास वाहतूक कोंडीत

वर्सोवा खाडीवरील जुन्या पुलाच्या दुरुस्तीनंतर त्याची वजन पेलण्याची क्षमता तपासण्यासाठी रविवारपासून चार दिवस हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, रविवारी संध्याकाळपासून या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सोमवारी सकाळपासूनच या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल एक ते दीड तास वाहने कोंडीत अडकली होती. काशिमीराहून वसईच्या दिशेने जाताना मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी जाणवली नसली तरी वसईहून काशिमीराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची प्रंचड वाहतूक कोंडी झाली. बुधवापर्यंत वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

पुलाच्या तडे गेलेल्या गर्डरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, परंतु मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने दुरुस्तीच्या कामानंतर पुलाची क्षमता तपासण्यासाठी हा पूल रविवारपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्याआधी या पुलावरून केवळ हलकी वाहने सोडली जात होती. मात्र जुना पूल बंद झाल्याने वाहतुकीचा सर्व भार नव्या पुलावर आल्याने सोमवारी वाहतूक कोंडीत भर पडू लागली. रविवारी दुपापर्यंत फारशी वाहतूक कोंडी जाणवली नाही, मात्र शनिवारी बाहेरगावी गेलेले अनेक जण रविवारी संध्याकाळी परतले असल्याने वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली. सोमवारी नियमित प्रवास करणाऱ्या वाहनांचीदेखील भर पडल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.

वसई कड ते मालजी पाडापर्यंत पाच किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर काजूपाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी झाल्यानंतर या रस्त्यावर अनेक वाहनचालक उलट बाजूने वाहन हाकत असतात, परंतु वाहतूक पोलिसांनी जागोजागी संरक्षक कठडे उभारून या वाहनांना अटकाव केल्याने त्यातल्या त्यात वाहनचालकांना दिलासा मिळत होता.

वाहतूक पोलीस वाढवले

वाहतूक कोंडीत वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर फाऊंटन हॉटेल नाक्यावर नेहमीच्या वाहतूक पोलिसांच्या संख्येत आणखी १५ पोलिसांची भर घालण्यात आली होती. हे पोलीस काशिमीराहून वसईच्या दिशेने जाणारी वाहने दर वीस मिनिटांनी सोडत होते आणि वसईहून येणाऱ्या वाहनांचा लोंढा जास्त असल्याने ही वाहने अर्धा तास सोडण्यात येत होती, तरीदेखील याठिकाणी वाहनचालक एक ते दीड तास कोंडीत अडकून पडत होते.

अवजड वाहनांमुळे कोंडीत वाढ

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्य़ातल्या मनोर नाका, शिरसाड नाका तसेच चिंचोटी फाटा या ठिकाणाहून अवजड वाहने भिवंडी मार्गावर वळविण्यात येत होती. परंतु वसई पट्टय़ातील औद्योगिक कारखान्यांची अवजड वाहने मात्र वर्सोवा पुलाच्या दिशेने येत होती, त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत होती, असे वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकाने सांगितले. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्यादेखील वाढवली आहे, मात्र तरीदेखील कोंडीचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

वाहतूक कोंडीच्या रांगेत एकदा शिरल्यानंतर बाहेर पडताच येत नसल्याने तासभर वाहतूक कोंडीचा सामना करण्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता. यात सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले.

– केशवर घरत, रहिवासी, घोडबंदर