आजपासून दुरुस्तीला सुरुवात; भिवंडी ग्रामीण भागातील अवजड वाहतुकीसाठी अधिसूचना नाही

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील नवीन खाडी पुलाच्या दुरुस्तीकामाला अखेर मुहूर्त सापडला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गुरुवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या पाश्र्वभूमीवर भिवंडी ग्रामीण भागातील मार्गावरून वळविण्यात आलेल्या अवजड वाहतुकीसाठी अधिसूचना काढण्याची गरज नसल्याचा अभिप्राय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकरवी ही माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आली. त्यानुसार गुरुवारपासून वाहतूक बदल अमलात येणार आहेत.

वर्सोवा येथील नवीन खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम २६ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात येणार होते. या कामासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने अधिसूचनाही काढली होती. या अधिसूचनेनुसार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सुरत ते दहिसर या मार्गिकेवरील अवजड वाहतूक भिवंडीमधून वळविण्यात आली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढली असली तरी भिवंडी ग्रामीण भागातील मार्गासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाला अधिसूचना काढावी लागणार होती. मात्र, ठाणे जिल्हा प्रशासनाने ही अधिसूचना काढलेली नसल्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बदलांची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर पडल्याचे समोर आले होते. दरम्यान, वर्सोवा खाडी पूल दुरुस्तीकामासाठी भिवंडी ग्रामीण भागातील मार्गावरून वळविण्यात आलेल्या अवजड वाहतुकीसाठी अधिसूचना काढण्याची गरज नसल्याचा अभिप्राय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाला नुकताच दिला आहे.

या अभिप्रायाबाबत ठाणे जिल्हा प्रशासनाने तोंडी कळविले असून त्याचबरोबर त्यांच्याकडून तसे लेखी पत्रही पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पत्र मिळेपर्यंत थांबण्याऐवजी आता पुलाच्या दुरुस्तीचे काम गुरुवार सकाळपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

वाहतूक बदल असे..

* मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सुरत-दहिसर मार्गिकेवरील हलकी वाहने नवीन खाडी पुलाच्या एका मार्गिकेवरून सोडली जाणार आहेत, तर दुसऱ्या मार्गिकेवर दुरुस्तीचे काम करणार आहे.

* या मार्गावरून हलकी वाहतूक सुरू असली तरी अवजड वाहतूक मात्र मनोर-वाडा-भिवंडी, शिरसाटफाटा-गणेशपुरी-वज्रेश्वरी व चिंचोटी-कामण-अंजुरफाटा या पर्यायी मार्गावरून वळवण्यात येईल.

वाहतूक पोलीसही सज्ज

वर्सोवा खाडी पूल दुरुस्तीकामाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या बदलादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह वाहतूक सेवक तैनात करण्यात येणार आहेत. महामार्ग पोलिसांकडून चार अधिकारी, ४० कर्मचारी तैनात करण्यात येणार असून त्यांना १५० वाहतूक सेवक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. तर ठाणे ग्रामीणचे ७ अधिकारी आणि ४६ कर्मचारी तैनात केले जाणार असून त्यांना मागणीनुसार शंभर वाहतूक सेवक अद्याप देण्यात आलेले नाहीत. ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडूनही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले जाणार असून त्यांना ९० पैकी काही वाहतूक सेवक देण्यात आले आहेत. उर्वरित रात्री उशिरापर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.