डोंबिवली – ज्येष्ठ विचारवंत आणि रशिया साम्यवादाचे अभ्यासक, माजी आमदार डाॅ. अशोक गजानन मोडक यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून डाॅ. अशोक मोडक आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील पवई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
गेल्या आठवड्यात डोंबिवलीतील चतुरंग प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने डाॅ. अशोक मोडक यांंना गौरविण्यात आले होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नव्हते. त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव आशिष मोडक. कन्या अर्चना भिडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते.
नाना ढोबळे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. १९६३ मध्ये अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी चाळीसगाव येथील महाविद्यालयात अध्यापनाला सुरूवात केली. मुंबईच्या रामनारायण रूईया महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. बिलासपूर येथील केंद्रीय विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. फैजाबाद येथील डाॅ. लोहिया अवध विश्वविद्यालयाने त्यांना डी. लिट. पदवीने सन्मानित केले होते. नेहरू विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली होती.
रशिया आणि साम्यवादाचे अभ्यासक म्हणून त्यांनी अनेक वेळा विविध परिषदा, देशाचा प्रतिनिधी म्हणून रशियाचा प्रवास केला. राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक म्हणून भारत सरकारने त्यांनी नियुक्ती केली होती. १९९४ मध्ये डाॅ. मोडक राजकारणात सक्रिय झाले. १२ वर्ष ते कोकण पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. या कालावधीत त्यांनी आपल्या मतदारसंघातील आदिवासी पाडे, गाव खेड्यात आपल्या आमदार निधीतून शाळा, आरोग्य विकासाची अनेक कामे केली.
त्यांनी ४० पुस्तकांचे लेखन केले आहे. १२० विषयांवर त्यांचे संशोधनपर निबंध आहेत. उत्तम संसदपटू म्हणून डाॅ. मोडक यांना गौरविण्यात आले होते. साधी राहणी, आदबशीर बोलणे आणि एस. टी. महामंडळाच्या बसने राज्यभर प्रवास, स्थानिक पातळीवर रिक्षेने प्रवास हे त्यांचे वैशिष्ट्य होते. दररोज सकाळी २५ सूर्यनमस्कार हा शिरस्ता त्यांनी आयुष्यभर पाळला. फाऊंटन पेन, त्यांचे सुबक वळणदार अक्षर आणि भाषण करताना, विधान परिषदेत बोलताना ते मुद्देसूद विषय मांडून विकास, नागरी समस्यांचे विषय तडीस नेत होते. पु. भा. भावे वक्तृत्व पुरस्कार, छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने ते सन्मानित होते. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
