डोंबिवली लैंगिक शोषण प्रकरण

डोंबिवली: डोंबिवलीतील सागाव लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुलीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे बुधवारपासून उपचार सुरू होते. आवश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून रुग्णालय प्रशासनाने शनिवारी घरी सोडले.

पीडित मुलगी राहते त्याच भागातील आरोपी मुले आहेत. या मुलीच्या संरक्षणाचा विचार करून तिला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. तिच्यावर ७२ तास उपचार सुरू होते. तिची प्रकृती स्थिर होती, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते.

आवश्यक ते वैद्यकीय उपचार आणि तपासासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय अहवाल, चाचण्या करून या मुलीला घरी सोडले आहे, अशी माहिती कळवा रुग्णालयाचे डीन डॉ. बी. एस. जाधव यांनी दिली.

या प्रकरणाची जलदगतीने चौकशी होण्यासाठी विशेष चौकशी पथक साहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केले आहे. या गुन्ह्यात ३३ आरोपी आहेत. त्यामध्ये दोन अल्पवयीन आहेत. २९ आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. चार आरोपींचा शोध सुरू आहे.

पीडित मुलीच्या नावाने तिचा प्रियकर विजय फुके सहकारी मित्रांकडून पाचशे रुपये घेत असे, असे पीडितेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेने स्वत: हा प्रकार एकदा डोंबिवली पूर्वेतील नवनीत नगरमधील एका सदनिकेत २३ मार्च रोजी पाहिला होता. प्रियकराने पीडितेला या गृहप्रकल्पात मित्राच्या घरी नेले. तेथे यावेळी खोलीत १४ जण उपस्थित होते.

तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देण्यात आले. तिच्यावर अत्याचार करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर खोलीत १४ जण उपस्थित असल्याचे तसेच विजय त्यांच्याकडून पाचशे रुपये घेत असल्याचे पीडितेने पाहिले आहे. पीडितेने प्राथमिक अहवालात नोंद केलेल्या प्रत्येक ओळ, शब्दाची चौकशी केली जात आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.