महाविद्यालयीन निवडणुका : एक मत आमचेही..

गुन्हेगारी वृत्ती वाढू लागल्याने २१ वर्षांपूर्वी महाविद्यालयातील निवडणुकांना बंदी घालण्यात आली होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारीत विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्याची पद्धत गेली अनेक वर्ष उपयोगात आणली जाते. मात्र…

गुन्हेगारी वृत्ती वाढू लागल्याने २१ वर्षांपूर्वी महाविद्यालयातील निवडणुकांना बंदी घालण्यात आली होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारीत विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्याची पद्धत गेली अनेक वर्ष उपयोगात आणली जाते. मात्र या पद्धतीमुळे चांगले नेतृत्व मिळत नसल्याची तक्रार होत आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारनेही महाविद्यालयांत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सकारात्मकता दाखवल्याने विद्यार्थीवर्गात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुका घेतल्यामुळे महाविद्यालयांत लोकशाही प्रक्रिया खऱ्या अर्थाने राबवली जाईल, असा आशावाद एकीकडे व्यक्त होत असतानाच यानिमित्ताने महाविद्यालयीन शिक्षणात राजकीय आणि अपप्रवृत्तींचा शिरकाव होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याच विषयावर ‘लोकसत्ता ठाणे’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कट्टय़ावरच्या गोलमेज’मध्ये सहभागी झालेल्यांनीही या दोन्ही बाजू मांडल्या. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये झालेल्या या चर्चा कार्यक्रमात ठाणे शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच गोवेली या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.


महाविद्यालयांत निवडणुका हव्यात का?
राहुल धमणे
महाविद्यालयातील हुशार विद्यार्थी हाच वर्ग प्रतिनिधी ठरणार हे समीकरण सध्या ठरलेले आहे. महाविद्यालयातील शैक्षणिकदृष्टय़ा अग्रेसर असलेल्या विद्यार्थ्यांलाच शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नेमण्यात येते. विद्यार्थी प्रतिनिधींमधून निवडण्यात येणाऱ्या जनरल सेक्रेटरीच्या मतदानामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांतील हुशार विद्यार्थ्यांचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधी निवड प्रक्रिया विशिष्ट विद्यार्थी वर्गापुरतीच मर्यादित राहते.
राहुल जाधव
मतदान हा लोकशाहीमधील नागरिकांना देण्यात आलेला मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे महाविद्यालयातही निवडणूक प्रक्रियेमार्फतच विद्यार्थी प्रतिनिधी नेमणे गरजेचे आहे. मतदार म्हणून आपण समाजव्यवस्थेचा एक अप्रत्यक्ष भाग बनत असतो. त्यामुळे निवडणूक पद्धत प्रत्येक महाविद्यालयात अंमलात आणणे गरजेचे आहे. सध्या निवडणूक प्रक्रियेविषयी तरुणांमध्ये नाराजी पाहायला मिळते. महाविद्यालयात निवडणुका झाल्या तर त्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होईल. निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधीमधून महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीची नेमणूक करण्यात येते. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या ही पद्धतही निवडणूक प्रक्रियेसारखीच आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अवलंबण्यात काहीच गैर नाही.
निखिल अरगडे
महाविद्यालयामध्ये निवडणूक पद्धत येणे धोकादायक वाटते. कारण निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे गट निर्माण होतील. गट निर्माण झाल्यामुळे एकमेकांविषयी द्वेश, इर्षां आदी गोष्टींची सुरुवात होते. एकमेकांना हरविण्यासाठी विद्यार्थी काहीवेळा चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतील आणि त्यामुळे विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांमधील संवेदनशीलताच हरवून बसेल.
दर्शन महाजन
सध्या आमच्या महाविद्यालयामध्ये गुणवत्तेनुसार विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात येत असून त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना संधी मिळत नाहीत. भविष्यात निवडणूक पद्धत अंमलात आणल्यास त्याचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होऊ शकेल. प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांला जबावदारीची जाणीव होईल आणि जे विद्यार्थी मतदान करतील, त्यांना हे आपण नेमके कोणाला निवडले आहे याची माहिती होऊ शकेल. आपण योग्य व्यक्तीला निवडून दिले पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये राहील. त्यामुळे निवडून आलेले व निवडून देणारे या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना निवडणुकीमुळे या प्रक्रियेचे महत्व लक्षात राहू शकले.निवडणुकांचा विद्यार्थी जीवनावर परिणाम होईल?
आश्विनी शर्मा
महाविद्यालयीन वातावरणाचा काळ हा शैक्षणिक जडण घडणीचा काळ असतो. शिक्षणाबरोबरच मनोरंजन आणि व्यक्तीमत्त्व विकासासाठी हा काळ महाविद्यालयीन तरुणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. अशा वेळी विद्यार्थी प्रतिनिधींसाठी महाविद्यालयात निवडणुकांचा शिरकाव झाला तर विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत वाढ होईल, स्पर्धा वाढली की एकमेकांबद्दल घृणा निर्माण होणे, अहंकाराची भावना तयार होईल आणि ज्या वयात एकजुटीने अभ्यास करायचा, एकमेकांसोबत यशस्वी व्हायचे, त्या वयात केवळ जिंकणे ही वृत्ती आल्याने नेतृत्वगुण वाढले तरी विद्यार्थ्यांमधली निरागसता हरवेल. त्यामुळे निवडणुका नकोच.
दर्पण गोनबरे
ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात महाविद्यालयीन वातावरणातही निवडणुका आल्या तर त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार नाही. एक फेम, ग्लॅमर याच दृष्टीकोनातून विद्यार्थी या निवडणुकांकडे पाहतील. मुळात महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी असो किंवा नसो, कामकाज सुरळीत चालू शकते. केवळ निवडणुकांमुळेच व्यक्तिमत्त्व विकास करूच शकेल, अशी परिस्थिती इथे नाही. व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक स्पर्धा, शिबीरे महाविद्यालयांमध्ये असून त्यातून व्यक्तीमत्व विकास होऊ शकतो. त्यामुळे महाविद्यालयीन वातावरणात बिघडण्याची शक्यताच अधिक निर्माण होईल.
निखिल अरगडे
निवडणुकांच्या माध्यमातून काही प्रमाणात नेतृत्वगुणांना वाव मिळत असतो, परंतु या उलट त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. निवडणुकांमुळे एक योग्य व्यक्ती म्हणून जडणघडण होण्याऐवजी, त्या विद्यार्थ्यांमध्ये अहंमपणाची भावना जागृत होते. नेतृत्वगुणांना विकास होण्यासाठी महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम होत असतात.
दर्शन महाजन
निवडणुकांच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना चालना मिळते. महाविद्यालयाच्या प्रतिनिधी म्हणून अनेक विद्यार्थ्यांसोबत राहून काम करणे, प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार त्यांच्याकडून कामे करून घेणे. याचा फायदा त्यांना त्याच्या भावी आयुष्यात नक्कीच होऊ शकतो. निवडणुकांमुळे व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. जो विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून निवडून येतात, त्यांच्यामध्ये अनेक अमूलाग्र बदल होतात. त्यांच्यामधील नेतृत्वगुणांना चालाना मिळते, एक चांगला वक्ता म्हणुन काम करायला मिळते.
आशिष शिंदे
निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्वगुण वाढीस लागण्यास मदत होईल. संवादकौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल. याशिवाय काही प्रमाणात महाविद्यालयीन निवडणुका या उद्याचे नेते घडवत असतात. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगाचा अनुभव येतो. त्यामुळे ही निवडणुकीची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक ठरेल.

आचारसंहिता कशी असावी?
राहुल धमणे
नक्कीच, महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया राबवायची असेल तर निश्चीतच आचारसंहितेची रचना करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांच्या राजकारणाने महाविद्यालयात प्रवेश करता कामा नये. बाहेरच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक काळात महाविद्यालयात प्रवेश केल्यास महाविद्यालयाची शिस्तभंग होईल. त्यामुळे अशा गोष्टींना आचारसंहितेच्या साहाय्याने आळा घालणे शक्य आहे. ठराविक वेळेनंतर वर्ग सुरू असताना निवडणूक प्रचार करण्यास परवानगी नसावी.
आशिष शिंदे
निवडणुकांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अर्थात आचारसंहिता असेल तर योग्यच आहे. निवडणुकीच्या काळात महाविद्यालयात येण्या-जाण्याच्या वेळेवर बंधन असले पाहिजे. या काळात बाहेरच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशास बंदी असावी, शिवाय प्रचारासाठी पोस्टर्सचा वैगेरे वापर नसावा. त्याला राजकारणाचे स्वरूप येता कामा नये. त्यात महाविद्यालयीन निवडणुकांची मजा राहणार नाही.
राहुल जाधव
निवडणुकांसाठी आचारसंहिता निश्चीत करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांचा महाविद्यालयात शिरकाव झाला तर महाविद्यालयीन वातावरण कलूषित होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी आचारसंहितेअंतर्गत कडक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आचारसंहितेची योग्य आखणी व अंमलबजावणी झाल्यास निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पडणे शक्य होईल.
काय असावेत निवडणुकीचे निकष ?
राहुल जाधव
स्त्री-पुरूष समानतेचा विचार करून विद्यार्थी प्रतिनिधी निवडीची पद्धत ग्रामीण भागातील महाविद्यालयात असणे गरजेचे आहे. एका वर्षी जनरल सेक्रेटरी विद्यार्थी असेल तर पुढच्या वर्षी विद्यार्थिनीला जनरल सेक्रेटरी म्हणून संधी देण्याची गरज आहे. सर्वगुणसंपन्न असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनीचीच निवड प्रतिनिधी म्हणून करण्यात येणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून महाविद्यालयाचा विकास कसा होईल यासाठी जनरल सेक्रेटरीने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
आश्विनी शर्मा
कोणत्याही गुणांशिवाय आपल्याला एखादा पद मिळत नाही. महाविद्यालयात येण्याचे मुख्य उद्दिष्ट अभ्यास हे असते. त्यामुळे अभ्यासासोबतच त्या व्यक्तीचे इतर कलागुण तपासणे महत्वाचे ठरते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे निवडणुकांमध्ये तुमच्या ओळखीपेक्षा तुम्ही किती काम करत आहात, या निकषांवर निवड केली गेली पाहिजे. इतरांसाठी काम करण्याची वृत्ती हवी. किंवा उमेदवारासाठी एखादी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी.
दर्शन महाजन
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीबद्दलच्या अपेक्षा वेगळया असतात, त्यामुळे निवडणूक हे योग्य माध्यम आहे, तसेच निवडणुकीला उभा राहणारा व्यक्ती हा संवेदनशील आणि सर्वगुणसंपन्न असावा.

महाविद्यालयांतील राजकारण वाढेल?
आशिष शिंदे
निवडणुकांमुळे राजकीय पक्ष महाविद्यालयात शिरकाव करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असताच कामा नये. तसा नियम असणे गरजेचे आहे. पक्ष आला की कार्यकर्ते आले, त्यामुळे शैक्षणिक वातावरण गढूळ होण्याची शक्यताच अधिक असते. त्यामुळे महाविद्यालयातील निवडणुकांमध्ये पक्षांचा शिरकाव नकोच.
अश्विनी शर्मा
महाविद्यालयात निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष सक्रीय झाल्यास विद्यार्थ्यांनी केलेली मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ शकतो. राजकीय पक्षामुळे निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्या इशाऱ्यावरच काम करावे लागणार असून त्यामुळे त्याला प्रतिनिधीपदाचाही आनंद घेता येणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: View of young generation on college election

ताज्या बातम्या