ठाणे – मराठी चित्रपटसृष्टीत तरुणाईची आवड अचूक ओळखणारे दिग्दर्शक – निर्माते विजू माने पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेगळ्या विषयासह भेटायला सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या स्ट्रगलर साला या वेब सिरीजनंतर आता ते ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ या नव्या चित्रपटातून मैत्रीची भन्नाट गोष्ट मोठ्या पडद्यावर आणत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि कंटेंटची एक वेगळीच लाट पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निर्माते-दिग्दर्शकही वेगळ्या आणि वास्तवाशी जवळीक साधणाऱ्या कथा मोठ्या पडद्यावर आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे. स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा तरुणाईच्या भावविश्वाशी नाळ जोडणारा विषय घेऊन येत आहेत. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाच्या नावावरूनच मैत्री, गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधील मोकळीक यांचा भन्नाट मेळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना विजू माने म्हणाले की, ‘स्ट्रगलर साला’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “प्रेक्षकांनी त्या मालिकेतील पात्रांना मनापासून प्रेम दिलं. त्यांच्या मैत्रीशी स्वतःला जोडून घेतलं. याच प्रेमामुळे पुन्हा एकदा मैत्रीवर आधारित कथा सांगण्याचं धाडस मला मिळालं,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.
या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे हटके आणि लक्षवेधी शीर्षक. ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मित्रमंडळींसोबतच्या गोवा ट्रिपच्या आठवणी ताज्या होतात. अनेकांचे प्लॅन झालेले पण अर्धवट राहिलेले ‘गोवा ट्रिप’ या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत येणार आहेत. सध्या चित्रपटातील कलाकारांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. मात्र या ‘सस्पेन्स’मुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नेमके कोणते चेहरे या मैत्रीच्या प्रवासात दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, ‘फ्रेंडशिप डे’च्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हसवणूक, भावनिक क्षण आणि जुन्या आठवणींचा संगम असलेला हा चित्रपट तरुणाईसाठी खास ‘ट्रीट’ ठरणार आहे. एकंदरीतच, विजू माने यांचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांना मैत्रीचा नवा ‘हँगओव्हर’ देणार, यात शंका नाही. आता या गोवा सफरीसाठी प्रेक्षकही तेवढ्याच उत्साहात तयार झाले आहेत.
