ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूलावर बुधवारी सायंकाळी क्रेन उलटली. साकेत ते आनंदनगर उन्नत मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ही क्रेन वापरली जात होती. या अपघातामुळे मुंबई आणि ठाणे शहरात अभूतपूर्व वाहतुक कोंडी झाली. महामार्गावरील मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते विक्रोळी आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते माजिवडा चौका पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीचा परिणाम ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवरही झाला. रात्री कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले.
ठाणे शहरात साकेत पूल ते कोपरी येथील आनंदनगर उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या कामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी खोदकामे झाली असून त्याभोवती अडथळे बसविण्यात आले आहेत. कोपरी येथील रेल्वे पूलावरही याच प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे मोठ्या क्रेन उभ्या केल्या जातात. बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास येथील क्रेन तांत्रिक बिघाडामुळे उलटली. क्रेनचा बहुतांश भाग ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर झुकला.
त्याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला. वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गावरून वाहतुक वळविण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त क्रेन रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याने रात्री ८ नंतरही क्रेन रस्त्यामधून बाजूला झाली नव्हती. त्यामुळे रात्री वाहनांचा भार वाढल्याने कोंडीत भर पडली. येथील दोन्ही मार्गिकेवर मोठ्याप्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबईहून ठाणे शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते विक्रोळी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर ठाणे शहरात मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते माजिवडा चौकापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे ठाणे शहरातील कोपरी, बाराबंगला, खोपट, गोकुळनगर येथील अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.
