डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक, पलावा रेल्वे उड्डाण पुलासाठी निळजे, काटई भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने भूसंपादित करून या रस्ते, पुलांची उभारणी केली आहे. त्यामुळे या भागातील पुलाला पलावा रेल्वे उड्डाण पुला ऐवजी काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल असे नाव पाहिजे, असा आग्रह धरत काटई, निळजे गावातील जाणत्या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पलावा चौक भागातील पुलाचे काटई, निळजे रेल्वे उड्डाण पूल असे गुरूवारी नामकरण केले.
कल्याण शिळफाटा रस्त्याची उभारणी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करून करण्यात आली आहे. या रस्त्याचे रूंदीकरण, सीमेंट काँक्रिटीकरण करून हा रस्ता अलीकडे सुस्थितीत करण्यात आला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे कल्याण शिळफाटा रस्ता आणि या रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलांची उभारणी झाली आहे. या भागात नव्याने वसाहती उभ्या राहत असल्या तरी भागातील गावे पूर्वपरंपार आहेत. त्यामुळे नवीन वसाहतींच्या नावे या भागातील चौक, उड्डाण पुलांना नावे देऊ नयेत. स्थानिकांनी या रस्ते काम, पुलासाठी जमिनी दिल्या आहेत. स्थानिक ठिकाणांच्या आठवणी पुसल्या जाऊ नयेत, अशी मागणी काटईचे सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी रेल्वे, शासनाकडे केली होती. परंतु, रेल्वे, शासन पातळीवर त्याची दखल घेतली जात नव्हती.
पलावा चौक भागातील रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल लवकरच काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलाच्या दोन्ही टोकांना रेल्वे किंवा रस्ते राज्य रस्ते महामंडळाकडून पलावा रेल्वे उड्डाण पूल किंवा या भागातील वसाहतीते नाव देण्याची शक्यता विचारात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी काटईचे सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्या पुढाकाराने गुरूवारी स्वताहून पलावा रेल्वे उड्डाण पूल मार्गाला काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल असे नाव देऊन या नामकरण फलकाचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत गुरूवारी अनावरण करण्यात आले.
कल्याण शिळफाटा रस्त्यावर मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांच्या नावे आता संबंधित ठिकाणे, रस्ते, चौक, वळण रस्ते ओळखले जात आहेत. या नव्या बदलामुळे शिळफाटा रस्त्यावरील जुन्या आठवणी पुसल्या जाण्याची शक्यता आहे. जु्न्या स्थानिक शेतकरी मंडळींनी शिळफाटा रस्ते, पुलासाठी जमिनी दिल्या म्हणून या भागात पायाभूत सुविधांची उभारणी झाली. त्या रस्ते, पुलांना नव्या वसाहती, संकुलांच्या नावाने ओळखले जाणार असेल तर ते चुकीचे आहे. आमच्या या रस्त्यावरील जुन्या आठवणी कधीही विसरून देणार नाही. त्यामुळे आम्ही शासन, रेल्वेच्या मंजुरीची वाट न पाहता पलावा रेल्वे उड्डाण पुलाचे काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल नामकरण केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी दिली.