ठाणे : ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्या कुटुंबीयांसह भोंदू फिरोज शेख याच्याविरोधात विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या फिरोज शेख याला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याच्या एका सहकाऱ्याला पोलिसांनी सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतले असून त्याची या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत, पत्नी शामल राऊत तसेच अन्य चौघांसह एकूण सात जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जादूटोण्याच्या नावाखाली अमानुष छळ, क्रूर वागणूक आणि फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फिरोज शेख या भोंदूला अटक केली आहे.
गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबीयांकडून अघोरी प्रकार करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सप्टेंबर २०१८ मध्ये मासिक पाळीदरम्यान रस्त्यावर फुटलेला नारळ, हळद-कुंकू आदी वस्तू आढळल्या होत्या. त्यानंतर सासू शामल राऊत यांनी ही बाब विनायक राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उपचाराच्या नावाखाली भोंदू मांत्रिक आणि अघोरी विधी करणाऱ्यांकडे नेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सुरुवातीला वाकोला येथील राहत्या घरी एका भोंदूला बोलावण्यात आले. त्याने तंत्र-मंत्र करून राऊत कुटुंबाच्या देवावर बंधन असल्याचे सांगितले. त्यानंतर चुलते सासरे आबा राऊत यांच्या अंगात देवीचा संचार झाल्याचे सांगण्यात आले. गिरीजा पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत, असेही त्यांनी सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. मात्र, उपचार कधी पूर्ण होतील, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर विनायक राऊत यांच्या सांगण्यावरून त्यांचे कार्यकर्ते आणि पती गितेश राऊत यांनी गिरीजा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोंदू फिरोज शेख, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील काझी आणि कुडाळ येथील हरीशचंद्र घाडी यांच्याकडे नेल्याचा आरोप आहे.
गिरीजा राऊत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भोंदू फिरोज शेख याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी फिरोज शेखच्या एका साथीदाराला संशयित म्हणून सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
