सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन
कलेला राजश्रय नव्हे तर कला राजपुरस्कृत करण्याची गरज असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार व्यक्त केले आहे. त्यामुळे कलेला राजपुरस्कृत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले. ठाण्यातील ९६ व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या रंगमंचास रविवारी तावडे यांनी भेट दिली. बंगालनंतरची सगळ्यात टिकून राहिलेली मराठी रंगभूमी असून आपण ती टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठी रंगभूमी केवळ विकेंण्ड नाटकांपुरती मर्यादीत बनू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.
मराठी शाळांमध्ये नाटक हा विषय शिकवण्याचा विचार करायचा झाल्यास जागतिक स्तरावर अशाप्रकारच्या सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती करून घेतली जाईल. त्याचप्रमाणे ते शिक्षण कशाप्रकारचे असू शकते यावरही विचाविमर्श करून यावर निर्णय घेता येईल. सध्या नाटय़गृहांची दैनिय अवस्था असून महापालिकेच्या हद्दीतील नाटय़गृह सुधारण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. शिवाय प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये नाटय़गृह व्हावे यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा..
महाराष्ट्रातील तरूण रंगकर्मीना नाटकांची हक्काची जागा उपलब्ध व्हावी यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा तावडे यांनी यावेळी केली. दादासाहेब फाळके नाटय़नगरीची सुधारणा करण्यात येत असून त्यामध्ये एका वस्तीगृहासह मुलांसाठी नाटय़शाळा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.