Viral Video : मुंबईतील मीरा रोड भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका रेस्तराँच्या मालकाला मारहाण केली आहे. मराठीत बोलला नाही म्हणून या रेस्तराँच्या मालकाला मारहाण करण्यात आली आहे. तीन मनसे कार्यकर्त्यांनी या रेस्तराँच्या मालकाला काही प्रश्न विचारले. तो मराठीत बोलत नव्हता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. विशेष बाब म्हणजे हे तिन्ही कार्यकर्ते हिंदीत बोलत त्याला हे सगळं सांगत होते.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
रेस्तराँचा मालक मराठीत बोलला नाही म्हणून त्याला मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत हे दिसतं आहे की मला हे माहीत नाही की मराठी सक्तीची आहे. मला कुणीतरी मराठी भाषा शिकवा मी मराठीत बोलेन असं त्याने शांतपणे या तीन कार्यकर्त्यांना सांगितलं. यावरुनच वाद सुरु झाला. हा महाराष्ट्र आहे, मग तुला मराठीतच बोलावं लागेल असं मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी सांगितलं. तू कुठल्या राज्यात व्यवसाय करतो आहेस? त्यावर तो रेस्तराँ मालक म्हणाला की महाराष्ट्रात. मग तुला मराठीच बोलावं लागेल असं म्हणत त्याला मारायला सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे हे मनसेचे हे सगळे कार्यकर्ते त्या रेस्तराँ मालकाला हिंदीत हे बजावत होते की मराठी में बोल. सचिन गुप्ता नावाच्या स्थानिक पत्रकाराने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा
मनसेचे कार्यकर्ते पुढे त्या रेस्तराँ मालकाला विचारतात तू महाराष्ट्रात कुठली भाषा बोलली पाहिजे? त्यावर तो मालक सांगतो महाराष्ट्रात सगळ्यात भाषा बोलल्या जातात. रेस्तराँ मालकाने हे उत्तर दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला कानशिलात लगावली. तसंच इतरही कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी या मालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?
या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ही कानशिलात त्या व्यक्तीला नाही तर यंत्रणेला आहे अशी कमेंट एकाने केली आहे. उत्तर भारतीयांना मुंबईत मारहाण केली जाते आहे कारवाई कधी होणार असं दुसऱ्या युजरने विचारलं आहे. एकमेकांना एकमेकांच्या विरोधात भडकवायचं, आक्रमक व्हायला लावायचं आणि जात, धर्म, पक्ष पाहून कायदे लागू करायचे हे सगळं फार चिंताजनक आहे असं आसिफ आझमी नावाच्या एका युजरने म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत शांत का आहेत? असंही एका युजरने विचारलं आहे.