ठाणे – विरार – अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे.यातील काही भाग हा कल्याण शहरातून देखील जात आहे. मात्र याचा थेट परिणाम आता कल्याण येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
या महत्त्वाकांक्षी कॉरिडॉरचा प्रस्तावित मार्ग कल्याणमधील शिरढोण परिसरातील म्हाडाच्या भूखंडातून जाणार आहे, जिथे परवडणाऱ्या घरांची उभारणी प्रस्तावित आहे. यामुळे म्हाडाच्या माध्यमातून या मार्गाच्या उभारणीसाठी लागणारी जागा देण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. तर मार्ग बरोबर भूखंडाच्या मधून जात असल्याने या ठिकाणी म्हाडाच्या घरांची या मार्गाच्या दुतर्फा उभारणी करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे.
म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी म्हाडाच्या घरांची उभारणी होत आहे. यामध्ये कल्याण आणि डोंबिवली येथे याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच प्रकल्पांपैकी एक असलेला शिरढोण येथे म्हाडाच्या घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या ठिकाणाहून आता विरार अलिबाग मल्टिमोड़ल कॉरिडॉरचा मार्ग जाणार आहे. यामुळे येथील काही भाग हा मार्गाच्या उभारणीसाठी जाणार आहे. हा भाग प्रकल्पासाठी संपादित करावा लागणार आहे.
मंजूर आराखड्यानुसार, सुमारे ५०० मीटर लांबीचा आणि १०० मीटर रुंदीचा सलग भूभाग कॉरिडॉरसाठी आवश्यक आहे. म्हाडा प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएसआरडीसी ने मागितलेली जमीन सध्या रिकामी असून ती प्रकल्पासाठी हस्तांतरित करता येऊ शकते. मात्र, या कॉरिडॉरमुळे म्हाडाचा भूखंड जवळपास दोन भागांत विभागला जाणार असून, सुमारे ५ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे.
या भूखंडावरील काही भागात आधीच घरांचे बांधकाम सुरू झाले असून, म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत लॉटरी पद्धतीने घरे विक्रीस काढण्यात आली आहेत. तर उर्वरित भागात देखील घरांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. मात्र आता हा मार्ग जाणार असल्याने हा प्रकल्प दोन भागांमध्ये उभारण्यात येणार आहे. तर यासाठी म्हाडाच्या वतीने एमएसआरडीसीकडे ५० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी देखील केली असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली आहे.
१२६ किलोमीटर लांबीचा हा विरार – अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर शिरढोण येथील त्या भूखंडावरून जात आहे, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांच्यासाठी घरांच्या बांधकामासाठी आरक्षित आहे. ग्रीनफिल्ड पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या या मल्टिमोडल कॉरिडॉरमध्ये वाहन वाहतूक, रेल्वे आणि बस यांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेशात जलद आणि सुलभ दळणवळण उपलब्ध होणार आहे.
पहिला टप्पा ठाणे जिल्ह्यातील नवघर ते रायगड जिल्ह्यातील बलावली दरम्यान ९६.४१ किलोमीटर लांबीचा असून, तो पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतून जाणार आहे. हा टप्पा ११ पॅकेजमध्ये राबवला जात आहे.
शिरढोण येथून म्हाडाच्या जागेतून विरार अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर जात आहे. यामुळे म्हाडाचा घरउभारणीचा प्रकल्प दोन भागात विभागाला गेला आहे. – विशाल राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोकण म्हाडा.

