ठाणे : इस्त्रायल आणि इराणमध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीमुळे ठाणे जिल्ह्यातील शेकडो नागरिक परदेशात अडकले होते. यामध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाचाही सामावेश होता. तो कुवेतमध्ये अडकला होता. मुलगा कुवेतमध्ये अडकल्याने विशाखा सुभेदार यांचे अश्रू अनावर झाले होते. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नानंतर विशाखा सुभेदार यांचा मुलगा सुखरुप मायदेशी परताला. त्याने रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
इराण-इस्त्रायल देशाच्या संघर्षामुळे ठाणे, पुणे, मुरबाड, शहापूर, अहिल्यानगर, मुंबई अशा विविध भागातील नागरिक दुबई, कुवेतमध्ये अडकले होते. यामध्ये १६४ पर्यटक आणि नागरिकांचा सामावेश होता.
मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जाण्यासाठी निघाला असता युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला होता. संघर्षामुळे त्याचे त्या ठिकाणी प्रचंड हाल झाले. चित्रीकरणाद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती. त्यांना अश्रू आवर झाले होते. या चित्रीकरणाची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनय याच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली असल्याचे सांगितले. तसेच, अभिनय याला लवकरच भारतात आणणार असल्याचे देखील म्हटले. काही दिवसांपूर्वीच अभिनय हा कुवेतमधून सुखरुप मायदेशी परतला.
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाने घेतली एकनाथ शिंदे यांची भेटhttps://t.co/2jrmCKw8Ui
— LoksattaLive (@LoksattaLive) March 15, 2026
ठाणे : इस्त्रायल आणि इराणमध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीमुळे ठाणे जिल्ह्यातील शेकडो नागरिक परदेशात अडकले होते. यामध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाचाही सामावेश… pic.twitter.com/SOXxQhqJsP
रविवारी विशाखा सुभेदार आणि अभिनय यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यांचे आभार मानले. यावेळी मी फक्त कर्तव्य भावनेतून मदत केली असल्याचे शिंदे यांनी त्यांना सांगितले. तसेच सुखरूपपणे मायदेशी परतल्यानंतर अभिनयची विचारपूस करून त्याला भावी वाटचालीसाठी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
