ठाणे – मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जायला निघाला असता युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला आहे. याबद्दल व्हिडिओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती. या व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनय याच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मंडळाचे डॉ. पैठणकर यांनीही त्यांच्या लोकांना फोन करून त्याच्याशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे. यासोबतच जशी विमानसेवा पूर्ववत होईल तसे त्याला पुन्हा मुंबईत सुखरूप आणण्यात येईल असेही शिंदे यांनी विशाखा यांना सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले.
अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांतील विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक भारतीय त्यात अडकले आहेत.
हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. त्यामुळे त्या भागात असलेल्या आपल्या कुटुंबीयांबद्दल अनेक जण काळजी व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच काही कलाकार आणि त्यांचे कुटुंबीयही अडकले आहेत. ईशा गुप्ता, सोनल चौहान व नर्गिस फाखरी यांनी या संदर्भात माहिती दिली होती. अशातच आता मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनयसुद्धा कुवेतमध्ये अडकला आहे. लंडनला जात असताना त्याचं विमान कुवैतमध्ये उतरवलं गेलं असून, तिथल्या परिस्थितीमुळे विशाखा यांनी लेकाच्या काळजीपोटी मदत मागितली आहे.
मुलाला भारतात सुखरूप आणलं जावं यासाठी विशाखा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे. मुलाच्या काळजीपोटी विशाखा यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यामुळे रडत रडत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्यांनी मदत मागितली आहे. याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला भारतात परत आणण्याबाबत आश्वस्त केले आहे.
