ठाणे – विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या सेवा विभागातर्फे ‘सेवाकुंभ’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवाकुंभाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पांची माहिती नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे. हा उपक्रम रविवार, १ मार्च रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे.
विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या सेवा विभागातर्फे आयोजित सेवाकुंभामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, स्वावलंबन व कौशल्य विकास, गोसंवर्धन तसेच पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांतील सेवाकार्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या विषयांवर आधारित विविध सेवा प्रकल्पांचे माहितीपर स्टॉल्स उभारण्यात येणार असून, प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचे कार्य नागरिकांना पाहता येणार आहे.
सेवाकुंभात भिवंडी-आनगाव येथील भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ, नेरळ येथील विद्या विकास मंदिर, १९७६ पासून कार्यरत असलेली गोवा येथील मातृछाया, चिपळूण-माळडोळी येथील रामचंद्र वासुदेव मराठे न्यास, १९६६ पासून तलासरी येथे कार्यरत असलेले वनवासी कल्याण केंद्र, सायन येथील शिव कल्याण केंद्र तसेच गोरेगाव येथील भारत विकास परिषद या संस्थांच्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सेवाकुंभ या अभिनव उपक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहमंत्री व सहसेवा प्रमुख स्वपन मुखर्जी यांची उपस्थिती असणार आहे. तसेच औरम उद्योग समूहाचे आशिष देवरा हे विशेष अतिथी, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई हे अध्यक्ष तर दिनेश तहलियानी हे सेवाकुंभ स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या सेवा विभागामार्फत सध्या २८४ सेवा प्रकल्प कार्यरत असून, देशभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून ७,१६५ सेवा केंद्रे चालविली जात आहेत. ठाणेकरांनी या सेवाकुंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक सेवाकार्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सेवा विभागातर्फे करण्यात आले आहे.

