‘लोकसत्ता’ आयोजित ‘नामरंगी रंगले’मध्ये प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन

ठाणे : कार्तिक महिन्यातील एकादशीला विठ्ठलभक्तीचा सोहळा अनुभवलेली असंख्य मने अजूनही विठुनामाच्या गजरात दंग आहेत. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘नामरंगी रंगले’ या अनोख्या मैफिलीतून विठुनामाचा हा गजर पुन्हा रंगणार आहे. ठाण्यात रंगणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने दीड वर्षांनंतर रसिक प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैफिलीचा आस्वाद घेता येणार आहे.

नाटकाचे वेड मनापासून जपणारा महाराष्ट्रातील रसिक भक्तिसंगीताच्या मैफिलीतही तितकाच तल्लीन होतो, मात्र करोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ रसिकांना प्रत्यक्ष अशा प्रकारचा सोहळा अनुभवता आलेला नाही. या पार्श्वभूमी वर नुकत्याच झालेल्या कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने  २७ नोव्हेंबर रोजी ‘नामरंगी रंगले’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘केसरी टूर्स’ प्रायोजित आणि ‘पुराणिक बिल्डर्स’ सहप्रायोजित ‘नामरंगी रंगले’ ही भक्तिसंगीताची मैफील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात  होणार आहे.

‘सारेगम लिटिल चॅम्पियन्स’मधून घराघरात पोहोचलेले आणि सध्या याच कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ही मैफील रंगवणार आहेत. तर कार्यक्रमाचे निवेदन कुणाल रेगे करणार आहेत.

एक मोठा काळ करोनाच्या तणावात्मक परिस्थितीचा सामना सगळ्यांनीच केला आहे. या काळात सांस्कृतिक कार्यक्रमही ‘ऑनलाइन’ अनुभवावे लागले होते. करोनाचे प्रमाण हळूहळू कमी होत असताना नाटक-संगीताचे कार्यक्रमही पुन्हा त्याच जोमाने प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी जय्यत तयारीत आहेत. विठुनामाच्या जागराचा कार्तिक महिना आणि वातावरणात असलेला भक्तिसोहळ्याचा उत्साह यामुळे ‘नामरंगी रंगले’ हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने रसिक-कलावंत यांच्या प्रत्यक्ष पुनर्भेटीचा सोहळा ठरणार आहे. मात्र, करोनाविषयक आखून दिलेल्या नियमानुसार ५० टक्के आसनक्षमतेत हा कार्यक्रम सादर होणार आहे.

  • कार्यक्रमाच्या प्रवेशिका गुरुवार, २५ नोव्हेंबर रोजी नाटय़गृहावर उपलब्ध.
  • वेळ : सकाळी ८.३० ते ११.००, संध्याकाळी ५.०० ते ८.३०
  • एका व्यक्तीस दोन प्रवेशिका प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

प्रायोजक ‘लोकसत्ता’ ‘नामरंगी रंगले’ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘केसरी टूर्स’ असून सहप्रायोजक ‘पुराणिक बिल्डर्स’ हे आहेत.