ठाणे – विठ्ठलवाडी परिसरातील एका बॅग बनविणाऱ्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीत दहा ते बारा वर्षे वयोगटातील दोन बालमजुरांची सुटका करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १६-१६ तास काम करून घेतले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ठाणे जिल्ह्यात बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘प्रथम’ संस्थेच्या सर्वेक्षणातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर कामगार विभागाने तातडीने कारवाई करत संबंधित कारखान्यावर छापा टाकला. याप्रकरणी संबंधित कारखानदारावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कल्याण कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

कल्याण, विठ्ठलवाडी तसेच उल्हासनगर येथे मोठ्या संख्येने कपडे, बॅग तसेच अनेक वस्तू बनविण्याचे लहान मोठे कारखाने आहेत. याठिकाणी परराज्यातून आलेले अनेक मजूर कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘प्रथम’ संस्थेने विठ्ठलवाडी परिसरात लहान बालकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले होते. याच दरम्यान श्रीराम चौक येथे एका बॅग बनविणाऱ्या कारखान्यात अल्पवयीन मुले काम करत असल्याची माहिती संस्थेला मिळाली. प्रत्यक्ष पाहणीअंती ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संस्थेने विलंब न लावता कल्याण येथील कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. बालमजुरीसारख्या विषयाची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

कामगार विभागाच्या पथकाने संबंधित कारखान्यावर धाड टाकत तपासणी केली असता दहा ते बारा वर्षे वयोगटातील दोन मुलांना काम करताना आढळले. या मुलांची सुटका करून त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. या मुलांकडून दररोज तब्बल १६ तास काम करून घेतले जात होते. अपुरी विश्रांती, शिक्षणापासून दुरावलेले जीवन आणि बालपणावर पडलेले श्रमाचे सावट यामुळे हा प्रकार अधिकच गंभीर ठरतो.

बालकांच्या आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अशा प्रकारची सक्तीची मजुरी अत्यंत घातक मानली जाते. बालमजुरी प्रतिबंधक कायद्यांनुसार अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारे काम करून घेणे हा दंडनीय गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण कामगार आयुक्त कार्यालयाने कारखान्याच्या मालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. संबंधित कारखान्याच्या कामकाजाची सखोल चौकशीही करण्यात येत आहे.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलांना लवकरच बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी समुपदेशन, शैक्षणिक पुनर्स्थापना आणि आवश्यक त्या सामाजिक सहाय्याच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन तसेच संबंधित संस्था प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पुढील योग्य दिशा निश्चित करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

लहान बालकांकडून मजुरी करून घेत जात असल्याची माहिती मिळताच तातडीने कार्यवाही करण्यात आली. सुटका केलेली बालके सुखरूप आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील आम्ही तत्पर आहोत. मुलांच्या सुरक्षेसाठी अशा पद्धतीची कार्यवाही नियमित सुरु राहील. – अनघा क्षीरसागर, सहाय्यक कामगार आयुक्त, कल्याण