शीळ रस्त्यावरील वाहतूक रोखल्याने कल्याण पूर्वमध्ये कोंडी

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ची मतमोजणी सोमवारी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये पार पडली. यासाठी बाजार समितीच्या समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने कल्याण पूर्वेतून रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही वाहतूक वालधुनी मार्गे वळवण्यात आली होती. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू झाल्याने या भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर डोंबिवलीतून कल्याणच्या दिशेने येणारी वाहने पत्रिपुलाच्या परिसरातून वळवण्यात येत होती. सकाळपासून वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना स्थानक परिसरामध्ये पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. तर शाळकरी मुलांनाही शाळेत जाण्याचा रस्ता अडवल्याने त्रास सहन करावा लागत होता.

कल्याण-डोंबिवली शहरामध्ये पर्यायी रस्त्यांची कमतरता असल्याने शिवाय पर्यायी रस्ते अरुंद असल्याने मतमोजणीच्या काळात मनस्ताप सहन करण्याची वेळ कल्याण-डोंबिवलीकरांवर आली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील आग्रा रोड नवी मुंबई, डोंबिवली आणि भिवंडी या शहरांना जोडणारा मार्ग असून त्यावरून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. सततच्या वाहतुकीमुळे हा परिसर वाहतूक कोंडीचे केंद्र असून मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर हा परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ही सगळी वाहतूक कल्याण पूर्वेतील पुनालिंक रस्त्यावर वळवण्यात आली होती. अधिक अरुंद आणि वेगवेगळी कामे सुरू असलेला पुना लिंक रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला होता. तर आग्रा रस्त्याच्या परिसरामध्ये विविध शाळा असून त्यामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांचे कडे ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची पोलिसांकडून अडवणूक होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. कल्याण शहरातून जाणारी वाहतूक बैलबाजार परिसरातील चौकातून वळवण्यात आली होती. त्यामुळे शहरातील या प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.