ठाणे : महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच प्रारुप मतदार यादी पालिका निवडणुक विभागाने तयार केल्या असून या मतदार याद्यांमधील त्रुटीसंदर्भात एकूण १३८ तक्रारी पालिका निवडणुक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजेच ३४ तक्रारी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील तर, सर्वात कमी म्हणजेच ४ तक्रारी वागळे इस्टेट प्रभाग क्षेत्रातील असल्याचे समोर आले आहे. मतदार यादीतून नाव वगळण्यात आले तसेच दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत नाव गेले आहे, अशा स्वरुपांच्या तक्रारी असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेची निवडणुक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुक विभागाने राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार निवडणुक पुर्वतयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनाने प्रभाग रचना अंतिम केली आहे. याशिवाय, आरक्षण प्रक्रीयाही उरकली आहे. त्यापाठोपाठ पालिका निवडणुक विभागाने मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु केले होते. राज्य निवडणुक आयोगाने २३ जून रोजी प्रारूप मतदार यादी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका निवडणुक विभागाने नुकतीच प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यात एकूण मतदारांची संख्या १३ लाख ९० हजार ६९१ इतकी आहे. त्यामध्ये ७ लाख ४५ हजार ४२४ इतके पुरुष मतदार तर, ६ लाख ४५ हजार १६७ इतक्या स्त्री मतदार आहेत. तसेच इतर मतदारांची संख्या १०० इतकी आहे. या यादीनुसार पालिका क्षेत्रात एक लाख ६२ हजार ८५ हजार मतदार वाढले आहेत. 

प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांवर २३ जून ते ३ जुलै या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत मतदार याद्यांमधील त्रुटीसंदर्भात एकूण १३८ तक्रारी पालिका निवडणुक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. मतदार यादीतून नाव वगळण्यात आले तसेच दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत नाव गेले आहे, अशा स्वरुपांच्या तक्रारींचा समावेश आहे. या संदर्भात पालिकेचे उपायुक्त मारुती खोडके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. विधानसभा निवडणुकीसाठी जी यादी होती, तीच यादी कायम ठेवण्यात आलेली आहे.  प्राप्त तक्रारींची प्रभाग समितीनिहाय सुनावणी घेण्यात आली असून त्यानुसार त्रुटी सुधारून मतदार यादी अंतिम केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हरकती सूचना आकडेवारी

प्रभाग समिती                    तक्रारी संख्या

माजिवडा-मानपाडा              १४

वर्तकनगर                         २३

लोकमान्य- सावरकरनगर       १०

उथळसर                          १५

वागळे इस्टेट                      ४

नौपाडा                             ८

कळवा                            ६

दिवा                              २४

मुंब्रा                               ३४

एकूण                              १३८

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter list highest complaints mumbra ward committee area ysh
First published on: 04-07-2022 at 15:15 IST