पालिकेचा दावा; बुजवण्यासाठी ४० कोटींची तरतूद

वसई : वसई-विरार शहरातील महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर केवळ २५० खड्डे असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने प्रथमच आरएमसीचा (रेडी मिक्स्ड काँक्रीट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाऊस असतानाही खड्डे बुजवणे शक्य होणार आहे. खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने यंदा ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पावसामुळे वसई-विरार शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर विविध संघटना आणि पक्षांनी खड्डे बुजवण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेने मात्र शहरात केवळ २५० खड्डे असल्याचा दावा केला आहे. शहरातून चार प्रमुख मोठे रस्ते असून ते राज्य महामार्ग आहेत. ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतात, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले.

वालीव नाक्यापासून वसई तहसीलदार कार्यालय, नालासोपारा ते निर्मळ, विरार फाटा ते अर्नाळा आणि सातिवली फाटा ते गोखिवरे रेंज ऑफिस आदी चार रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतात आणि त्या रस्त्यावर खड्डे असल्याचे लाड यांनी सांगितले. हे रस्ते वगळता शहरातील इतर रस्त्यांवर केवळ २५० पेक्षा कमी खड्डे आहेत, असे ते म्हणाले. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. येत्या १५ ते २० दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असा दावा महापालिकेने केला आहे.

खड्डे बुजवण्यासाठी ‘आरएमसी’चा वापर

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडणे ही सर्वच महापालिकांची मोठी समस्या असते. पूर्वी खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जायचे किंवा तात्पुरते खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि ग्रीटचे मिश्रण वापरले जात होते. परंतु डांबरीकरण करण्यासाठी किमान ६ ते ८ तासांचा कालावधी लागतो. त्यासाठी पावसाची उघडीप लागते. परंतु मोठा पाऊस आला की ते काम वाया जायचे. त्यामुळे पालिकेने यंदा प्रथमच आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील सिमेंट हे घट्ट असते आणि ते लगेच सुकते. त्यामुळे पाऊस आला तरी बुजवलेल्या खड्डय़ांवर काहीच परिणाम होत नाही, असे त्यांनी सांगितले. शहरात काही ठिकाणी आरएमसीचा वापर झाला आहे आणि त्यांचे चांगले परिणाम दिसून येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी शीत डांबरमिश्रीत खडी (कोल्ड मिक्स) आणि गरम डांबरमिश्रीत खडी (हॉट मिक्स) यांचा वापर करून पाहिला. मात्र तो फारसा उपयोगी ठरताना आढळून आलेला नाही.