कचराभूमीतील आणि संकलित केलेल्या प्लास्टिकचा अनोखा वापर

वसई : प्लास्टिकच्या दुष्परिणामुळे राज्य सरकारने ‘प्लास्टिक बंदी’ केली असली तरी सध्या अस्तित्वात असलेल्या प्लास्टिकचे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. वसई-विरार महापालिकेच्या कचराभूमीत १९ टक्के प्लास्टिकचा साठा आहे. महापालिकेने या प्लास्टिकचा वापर रस्ता तयार करण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी प्लास्टिक कचऱ्यापासून शहरातील काही रस्ते तयार करण्यात आले होते. आता सर्वच प्लास्टिक कचऱ्याचा वापर रस्तेनिर्मितीसाठी करणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

राज्य शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. त्याची चोख अंमलबजावणी करण्यासाठी आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांना दिले आहेत. प्लास्टिकवर कारवाई होत आहे, मात्र जे प्लास्टिक सध्या अस्तित्वात आहे, त्याचे काय करायचे, असा प्रश्न महापालिकेपुढे आहे. वसई-विरार महापालिकेच्या कचराभूमीत तब्बल १९ टक्के प्लास्टिक शिल्लक आहे. त्यामुळे या प्लास्टिकचा वापर करून रस्ते तयार करण्याचा पालिकेने ठरवले आहे. गेल्या वर्षी वसई-विरार महापालिकेने या प्लास्टिकचा वापर करून रस्ता तयार करण्याचा अनोखा प्रयोग केला होता. शहरात तीन ठिकाणी प्लास्टिकचा वापर करून रस्ते तयार करण्यात आले होते. दीड वर्षांनंतरही हे रस्ते टिकाऊ  असल्याचे पालिकेने सांगितले. त्यामुळे यापुढे सर्व रस्त्यांमध्ये प्लास्टिकचाच वापर केला जाणार असल्याचे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.

प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत वसई-विरार महापालिकेने शिल्लक प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकचा वापर करून रस्ते बनवावेत, अशी सूचना केली. त्यासाठी लागणारे तंत्रसाहाय्य देण्याची तयारी पालिकेने दिली आहे.

वापर कसा?

रस्त्याचे डांबरीकरण करताना डांबरात विशिष्ट प्रमाणानुसार टाकाऊ  प्लास्टिक मिसळले जाते. त्यानंतर ते डांबर डांबरीकरणासाठी वापरले जाते. डांबर व प्लास्टिक एकत्र होते तर खडी-डांबर हे एकमेकांना घट्ट चिटकून राहिल्याने रस्ता टिकण्याची क्षमता वाढते. टाकाऊ  प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे इतर साहित्य या रस्त्यात वापरले जाणार असून हे प्लास्टिक डांबरात मिश्रित केल्याने ते डोळ्याला दिसून येत नाही.

प्लास्टिक बंदीनंतर प्लास्टिकचा वापर बंद होईल. पण सध्या जे प्लास्टिक जमा झाले आहेत, त्याचा वापर करण्यासाठी या पर्यायावर पालिकेने भर दिला आहे.

– सुखदेव दरवेशी, प्रभारी साहाय्यक आयुक्त (आरोग्य), महापालिका

प्लास्टिकची समस्या उग्र असली तर ती दूर करण्यासाठी प्लास्टिक रस्त्याचा प्रयोग आम्ही यापूर्वीच शहरात केला होता. यापुढे शहरात जेवढे रस्ते तयार होतील, त्यात प्लास्टिकचाच वापर करण्याचे धोरणच पालिकेने तयार केले आहे.

– सतीश लोखंडे, आयुक्त, महापालिका