पालघर येथे वाघोबा उत्सव उत्साहात संपन्न

पालघर-मनोर मार्गावर असलेल्या वाघोबा खिंड येथे आज या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते

पालघर-मनोर मार्गावर असलेल्या वाघोबा खिंड येथे आज या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते (फोटो – नीरज राऊत)

पालघर शहराच्या वेशीवर वाघोबा देवीचे मंदिर असून आज आदिवासी परंपरेनुसार वाघोबा, भिलोबा, मेघोबा आदिवासी देवस्थान धर्मादाय संस्था व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोबा उत्सव उत्साहात संपन्न झाला. पालघर-मनोर मार्गावर असलेल्या वाघोबा खिंड येथे आज या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी बांधव निसर्गालाच देव मानत असून गावदेव, वाघोबा, भिलोबा, काळबाहरी, खंडेराव, मोर, शीतलदेवी, षडवाय आदी देवतांची सोंगे वाघोबा मंदिर परिसरात आणण्यात आली होती. आदिवासी पारंपरिक पद्धतीने त्यांचे पूजन करण्यात आले. निसर्ग पुजणार्‍या या समाजातर्फे प्राचीन काळापासून असलेल्या वाघोबा, भिलोबा व मेघोबा देवाची पूजा-अर्चा करून निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी साकडे घातले. या उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

पालघरच्या पूर्वेला वाघोबा खिंडीत वाघोबा या देवाचे मंदिर आहे. प्राचीन काळापासून डोंगरात राहणार्‍या आदिवासी समाजाचे रक्षण करतो तो वाघोबा. म्हणून पूर्वीपासून वाघोबा खिंड चढताना सुरुवातीला वाघोबा देवाचे मंदिर आहे. जंगलात राहणार्‍या भिल्ल देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे येथील आदिवासी मानतात. म्हणून खिंडीकडे चढताना वनराईत भिलोबा देवाचे देवस्थान आहे. तसेच प्राचीन काळापासून पाऊस पडावा यासाठी मेघदेव म्हणजेच मेघोबाला पुजण्याची व जागर घालायची परंपरा असल्याने येथे देवस्थानाच्या मागील बाजूस डोंगराळ भागात मेघोबा देवाचे देवस्थान आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने आदिवासी बांधव आपली संस्कृती, रीती-चाली,परंपरा जगासमोर आणतो. त्याद्वारे तो आपल्या समाजातील ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Waghoba utsav in palghar sgy

ताज्या बातम्या