ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ४५ वर्ष जुन्या इमारतीच्या गॅलरीचा (सज्जा) भाग कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या इमारतीच्या गच्चीवरील सदनिकेत दोन व्यक्ती राहत होत्या. त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत हलविल्यानंतर संपूर्ण इमारतीजवळ सुरक्षेच्या कारणास्तव धोकापट्टी बांधण्यात आली आहे.
नुरी शेख (६५) आणि सुरेश थापा (३६) अशी जखमींची नावे असून यातील नुरी यांच्या डोक्याला, पायाला, खांद्याला दुखापत झाली. तर सुरेश यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. परिसरातील नागरिकांनी नुरी यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. किसननगर क्रमांक दोन येथे तिवारी भवन ही ४५ वर्ष जुनी दुमजली इमारत आहे.
इमारतीच्या तळमजल्यावर तीन दुकाने, पहिल्या मजल्यावर दोन सदनिका, दुसऱ्या मजल्यावर एक सदनिका तर गच्चीवर एक सदनिका आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सदनिका बंद होत्या. तर गच्चीवर दोनजण वास्तव्यास होते. शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील बंद सदनिकेतील सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेत नुरी शेख आणि थापा यांना दुखापत झाली. सज्जाचा काही भाग धोकादायक स्थितीत होता.
घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर घटनास्थळी नगरसेवक योगेश जानकर, नगरसेवक प्रकाश शिंदे, महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी, वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त राजेश सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र चारी, उप अभियंता विजय फुलवर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, वागळे प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, महावितरण कर्मचारी, श्रीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्याकडून सुरक्षतेच्या कारणास्तव इमारत परिसरात धोकापट्टी बांधण्यात आली आहे. तसेच सज्जाभोवतीचा राडारोडा रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला आहे. वागळे इस्टेट प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त राजेश सोनवणे,आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवान, अग्निशमनद दलाचे कर्मचारी दाखल झाले.
