ठाणे – येथील वागळे इस्टेटमधील रस्ता क्रमांक १६ आणि २२ वर दररोज सायंकाळी खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांचा बाजार भरत असल्याने येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पदपथासह रस्त्यावरच हातगाड्या आणि ग्राहकांची गर्दी होत असल्याने टीएमटी बससह वाहनचालकांना तेथून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती. याबाबत तक्रारी प्राप्त होताच ठाणे महापालिकेने बुधवारी या ‘खाऊ गल्ली’ वर थेट कारवाई करत १० ते १५ हातगाड्या हटवून काही सिलिंडर जप्त केले तसेच काही गाड्या तोडून टाकल्या. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेटमधील रस्ता क्रमांक १६ आणि रस्ता क्रमांक २२ हे परिसरात मोठ्या आयटी कंपन्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भागातील पदपथ आणि रस्त्यांवर सायंकाळच्या वेळेत खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचे अतिक्रमण वाढले होते. हातगाड्यांभोवती खाद्यपदार्थ खाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत होता. या मार्गावर टीएमटीच्या बससह मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यातच हातगाड्या आणि त्यांच्याभोवतीची गर्दी रस्त्यावर येत असल्याने वाहतूकीसाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले होते.
या प्रकाराबाबत नागरिकांकडून ठाणे महापालिकेकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. काही लोकप्रतिनिधींनीही रस्ते आणि पदपथावरील हातगाड्या हटविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वागळे प्रभाग समितीने गेल्या काही दिवसांपासून या भागात कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सायंकाळी पुन्हा धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १० ते १५ हातगाड्या हटविण्यात आल्या. काही हातगाड्यांवरील सिलिंडर जप्त करण्यात आले, तर काही हातगाड्या तोडण्यात आल्या. सायंकाळच्या वेळेतच अतिक्रमण वाढत असल्याने यापुढेही याच वेळेत पालिकेच्या पथकाकडून नियमित कारवाई करण्याचे नियोजन आहे.
वागळे इस्टेटमधील रस्ता क्रमांक १६ आणि २२ वरील पदपथ आणि रस्त्यांवर सायंकाळच्या वेळेत खाद्य पदार्थ तसेच इतर हातगाड्या लागत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे, अशी माहिती वागळे इस्टेट प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांनी दिली.
