बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतिक्षाच; धरणक्षेत्रात अवघे ३३ टक्के पाणी, गेल्यावर्षापेक्षा ७ टक्क्यांनी कमी पाणी

गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला असला तरी धरण क्षेत्रात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतिक्षाच; धरणक्षेत्रात अवघे ३३ टक्के पाणी, गेल्यावर्षापेक्षा ७ टक्क्यांनी कमी पाणी
संग्रहित छायाचित्र

बदलापूरः गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला असला तरी धरण क्षेत्रात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या वेशीवर असलेले आणि जिल्ह्याची तहाण भागवणारे बारवी धरण अवघे  ३३ टक्के भरले आहे. धरणात अवघे ११५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ४० टक्क्यांवर होता. त्यामुळे धरणक्षेत्राला पावसाची प्रतिक्षाच आहे.

यंदाच्या वर्षात जून महिन्यात ठाणे जिल्ह्यात दशकभरातील निचांकी पावसाची नोंद झाली. संपूर्ण जून महिना तुरळक  पाऊस पडला. त्यामुळे त्याचा थेट परिणाम ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांवर झाला. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील  जवळपास सर्वच महापालिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र बारवी धरण  क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा वेगाने कमी झाला. बारवी धरणाची पाणी  क्षमता ३३८.६४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. आठवडाभरापूर्वी बारवी धरणात १०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तर  एकूण क्षमतेच्या  हा पाणीसाठा अवघा ३१ टक्के इतका होता. मात्र २९ जून पासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. गेल्या  चार दिवसात संततधार पाऊस सुरू आहे. त्यानंतरही बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याचे समोर आले आहे. बारवी धरणात सध्याच्या घडीला अवघे ११५ दशलक्ष घनमीटर  इतके पाणी आहे.  एकूण क्षमतेच्या  हे पाणी अवघे ३३.९५ इतके आहे. धरणाची पाणी पातळी सध्या ६१.२० टक्क्यावर आहे. गेल्या २४ तासात धरणात अवघा ५३ मिलीमीटर  इतका पाऊस झाला आहे. गेल्या  वर्षात बारवी धरणात ४०.५५ टक्के इतके पाणी होते. त्यामुळे आतापर्यंत धरणात जमा झालेले पाणी समाधानकारक नसून येत्या महिनाभरात पुरेसा पाऊस न पडल्यास पाणीप्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त होते आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाण्यात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर झाड पडले; परिसराचा वीज पुरवठा खंडित
फोटो गॅलरी