उल्हासनगरः अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणारी वालधुनी नदी उल्हासनगर रेल्वे स्थानकाशेजारून वाहते. येथून वाहत असताना दररोज हजारो किलो कचरा या नदीत मिसळतो आहे. नदीचा रंगही काळाशार झाला असून नदीत सांडपाणी मिसळत असल्याचेच समोर आले आहे. नदीच्या किनारी अनेक लहान मोठे कारखाने असून यातून कचरा आणि कच्चा माल थेट नदीत विसर्जीत केला जातो. हाच कचरा अनेक ठिकाणी अडकलेलाही दिसतो. त्यामुळे वालधुनी नदी कधी पूर्वपदावर येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रदुषणामुळे गटारगंगा झालेली वालधुनी नदी पुनरूज्जीवनाचे प्रयत्न कागदावरच आहेत. अनेक वर्षांपासून या नदीची दुरावस्था जैसी थी आहे. अंबरनाथच्या डोंगरातून उगम पावणारी ही नदी अंबरनाथ शहराच्या वेशीवरून पुढे उल्हासनगर शहरात प्रवेश करते. शिलाहार काळातील शिव मंदिराच्या शेजारून ही नदी वाहते. इथे नदीचे रूप शोधावे लागते. मंदिराच्या काही अंतरावरच अनेक नाले या नदीला येऊन मिळण्यास सुरूवात होतात. पुढे या नाल्यांची संख्या आणि नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाणही वाढते.
पुढे अनेक लहान मोठ्या उद्योगातून उरलेले, प्रक्रिया न केलेले सांडपाणी या नदीत मिसळते. त्यामुळे सुरूवातीला नालास्वरूप वाटणारी ही नदी पुढे अति प्रदुषीत नदीच्या रूपाने वाहते. उल्हासनगर स्थानकाशेजारून या नदीचे विस्तीर्ण रूप पाहता येते. येथे या नदीचा रंग प्रत्येक आठवड्याला बदललेला दिसतो. कधी हा रंग लालसर असतो तर अनेकदा काळाशार असतो. सध्या या नदीचा रंग गडद काळा झालेला आहे. या नदीच्या पात्राशेजारी असलेले अनेक उद्योग कंपनीतील उरलेला कच्चा माल, कचरा थेट नदीत फेकत असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा नदीच्या काठाशी अशा पद्धतीने ठेवला जातो की तो काही दिवसात थेट नैसर्गिकरित्या नदीच्या पात्रात जाऊन पडेल. पुढे हाच कचरा नदीत वाहून निघून जातो. अनेकदा तो अडकलेलाही पाहायला मिळतो.
सध्या वालधुनी नदीच्या उल्हासनगर स्थानकाच्या शेजारच्या प्रवाहाला लागूनच कल्याण ते बदलापूर तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. तर नदीच्या पात्राशेजारी मोठ्या प्रमाणावर पडलेला आणि वाहत असलेला कचरा दिसून येतो. हा कचरा नदी पात्रात जाण्यापासून रोखण्याची मागणी पर्यावरण प्रेमींची आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. वालधुनी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी अनेकदा घोषणा झाल्या. उल्हासनगर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केले होते. काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी शिवमंदिर परिसरात पाहणी करत येथील कामाचा आढावा घेतला होता. तर याबाबत उल्हासनगर महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
प्रतिक्रियाः वालधुनी नदीत कचरा आणि सांडपाणी मिसळतेच आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर अशा दोन्ही ठिकाणी नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या नदीसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून नदी पुनरूज्जीवन करण्याची गरज आहे. सध्या तरी नदीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते आहे – शशीकांत दायमा, वालधुनी जल बिरादरी, पर्यावरणप्रेमी.

