भटक्या श्वानांचा उपद्रव रोखणार?

वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

वसई-विरारमध्ये आणखी दोन श्वान निर्बीजीकरण केंद्रे प्रस्तावित; वर्षभरात सर्वच भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचा दावा

वसई-विरार शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने दोन नवीन श्वान निर्बीजीकरण केंद्रे प्रस्तावित केली आहेत. सध्या शहरात एकच केंद्र आहे. आतापर्यंत या केंद्राद्वारे २१ हजार श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ही दोन केंद्रे तयार झाल्यास एका वर्षांत शंभर टक्के श्वानांचे निर्बीजीकरण केले जाईल, असा दावा महापालिकेने केला आहे.

वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या ३५ हजारांहून अधिक भटकी श्वान आहेत. पंरतु हा आकडा ७०,००० असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महापालिकेकडे नवघर येथे एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात दररोज २० ते २५ श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते, परंतु  हे केंद्र अपुरे पडत आहे. त्यामुळे महापालिकेने आता दोन नवीन श्वान निर्बीजीकरण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने आता स्वत:हून दोन ठिकाणी जागा शोधल्या आहे. प्रभाग समिती ‘सी’मध्ये विरार पूर्वेला चंदनसार येथे तर प्रभाग समिती ‘ई’मध्ये नालासोपारा पश्चिमेला निर्मळ येथे जागा प्रस्तावित आहे. महापालिकेने या शासकीय जागा ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. ही दोन श्वान निर्बीजीकरण केंद्र तयार झाल्यानंतर महापालिकेकडे असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्रांची संख्या तीन होणार आहे. हे केंद्र तयार झाल्यास एकाच वर्षांत सर्व श्वानांचे निर्बीजीकरण केले जाईल, असा विश्वास प्रभारी साहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी सांगितले. श्वान निर्बीजीकरण १०० टक्के झाल्यास शहरातील श्वानांच्या वाढत्या संख्येवर आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शहरातील भटक्या श्वानांची संख्या ७० हजार असल्याचे शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी सांगितले. त्वरित नवीन श्वान निर्बीजीकरण केंद्र तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

श्वानशाळेचा प्रस्ताव बारगळला

महापालिकेचे अवघे एकच श्वान निर्बीजीकरण केंद्र असल्याने श्वानांची संख्या वाढत आहे. मात्र पालिकेला नव्या श्वान निर्बीजीकरणासाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे महापालिकेने समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांना जागा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी जागा दिल्यास श्वान निर्बीजीकरण केंद्र आणि श्वानांची शाळा सुरू करण्याचा पालिकेचा मनोदय होता. जागा देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेचे नाव त्या केंद्राला देण्यात येणार होते. आजारी असलेल्या, जर्जर झालेल्या भटक्या श्वानांचा सांभाळ आणि देखभाल या शाळेत करण्यात येणार होते. अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग ठरला असता. मात्र नागरिकांनी आणि पाणीप्रेमींनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे महापालिकेची ही योजना बारगळली आहे.

दोन नव्या जागा

महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत श्वान निर्बीजीकरण केंद्रासाठी जागा मागितली होती. पालघरजवळील केळवे येथे पाच एकर जागा देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शवली. मात्र तेथे जाणे गैरसोयीचे ठरणार असल्याने पालिकेने आपल्या हद्दीतच दोन नवीन जागा शोधल्या. ती जागा शासनाकडून हस्तांतरित करून घेण्यासाठी नगररचना विभागाकडे प्रस्तावही दाखल केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wandering dogs issue in vasai virar