बदलापूर: घराबाहेर येऊन पिण्यासाठी पाणी मागितले आणि ८० वर्षीय आजी पाणी घेऊन घरात जाताच त्यांच्या पाठीमागे घरात घुसून त्यांच्या गळ्यातील आणि हातातील तब्बल ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटल्याची संतापजनक घटना बदलापूरजवळील वांगणी येथे घडली. मात्र, ठाणे ग्रामीणच्या कुळगाव पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि कौशल्यपूर्ण तपास करत या दरोड्यातील तीन आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत लुटलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

वांगणी येथील विठ्ठल मंदिराजवळ राहणाऱ्या इंदुबाई शेलार ( ८०) या २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी तीन अनोळखी तरुण त्यांच्या घराबाहेर आले आणि त्यांनी तुमच्याकडे भाड्याने खोली आहे का अशी विचारणा करत आजींकडे पिण्यासाठी पाणी मागितले. वयोवृद्ध इंदुबाई यांनी त्यांना पाणी दिले आणि पाण्याचा तांब्या परत ठेवण्यासाठी त्या घरात वळल्या.

हीच संधी साधून ते तिघेही तरुण इंदुबाईंच्या पाठीमागे जबरदस्तीने घरात घुसले. त्यांनी आजींच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आणि दोन्ही हातांतील २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या असा एकूण ४५ ग्रॅमचा ऐवज जबरदस्तीने खेचून काढला. जर ओरडलीस तर जिवे ठार मारू, अशी धमकी देऊन या दरोडेखोरांनी तेथून पोबारा केला. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात फिर्यादी आजींना आरोपींची कोणतीही ओळख नव्हती आणि पोलिसांकडे कोणतेही ठोस धागेदोरे नव्हते. मात्र, कुळगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवली. कल्याणमधील चिंचपाडा, काटेमानिवली भागातील संशयितांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी संशयित राजेश अनंत शेलार ( ३९), गणेश भरत सोनवणे (३५) आणि शिवम राजदेव पांडे ( २६) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला साथीदार ऋषिकेश रमेश बांगर आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी राजेश शेलार, गणेश सोनवणे आणि शिवम पांडे या तिन्ही सराईत आरोपींना अटक केली असून, विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. तर, या गुन्ह्यातील फरारी आरोपी ऋषिकेश बांगर याचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या अटक केलेल्या आरोपींकडून लुटलेले सर्व ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने सुरक्षितपणे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोणतेही पुरावे नसताना अवघ्या १२ तासांत हा गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल कुळगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, प्रदीप बोदडे, हवालदार बी.एच. पवार, नाईक सोमनाथ मारे, शिपाई नरेंद्र कोळी, सचिन जाधव, अविनाश वाकचौरे आणि भूषण राजपूत यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि शिवाजी ढवळे करत आहेत.