ठाण्यात  बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (पॅनल) सर्वच पक्षांतील बडय़ा नगरसेवकांच्या पथ्यावर पडेल, असेच चित्र शुक्रवारी दिसून आले. या नव्या पद्धतीनुसार जवळपास प्रत्येक पॅनलमध्ये एक किंवा दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने दिग्गजांपुढील निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला रहाणार आहे. नव्या प्रभाग रचनेत ठाणे शहर, वागळे इस्टेट तसेच कळव्यातील काही बालेकिल्ल्यांमधील जागा कमी झाल्याने सत्ताधारी शिवसेनेपुढे मात्र उमेदवारांची निवड करताना आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

नव्या प्रभाग रचनेनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या एकने वाढून १३१ झाली असून नव्या आरक्षणानुसार महिलांना ६६ जागांवर आरक्षण मिळाल्याने नव्या सभागृहात पुरुषांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या जास्त असेल हे शुक्रवारीच स्पष्ट झाले. या वेळी अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या नऊ झाली असून गेल्या वेळच्या तुलनेत त्यातही वाढ झाली आहे. ठाणे शहराच्या तुलनेत दिव्यात सर्वाधिक जागा वाढल्या असून दोनवरून हा आकडा थेट ११ पर्यंत पोहोचला आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन नगरसेवकांची संख्या वाढून ३६ पर्यंत झाली आहे.

दिग्गजांना दिलासा

ठाण्यात चार नगरसेवकांचे एक पॅनल अशापद्धतीने निवडणूक घेण्याचे ठरविल्याने चार नगरसेवकांच्या प्रभागातील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय सर्वानाच उपलब्ध झाला आहे.  चार नगरसेवकांचे ३२ आणि तीन नगरसेवकांचा एक असे ३३ प्रभाग निश्चित झाले आहेत. यापैकी प्रत्येक प्रभागातील दोन जागा विविध आरक्षणांसह महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे बहुतांश प्रभागांमध्ये एक किंवा दोन जागा खुल्या संवर्गासाठी सुटल्याने दिग्गजांवर विस्थापित होण्याचे संकट तुर्तास टळल्याचे चित्र आहे.

  • नव्या रचनेनुसार कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३६ नगरसेवक असतील कोपरी-पाचपाखाडीतून ३२ नगरसेवक निवडून येतील.
  • शहरातून नगरसेवकांची संख्या कमी झाली असून घोडबंदरसह येथून २४ ते २८ नगरसेवक निवडून येतील. ओवळा-माजिवडय़ातून २० ते २४ तर दिव्यातून ११ अशी विभागणी असणार आहे.