ठाणे – ‘कैसा हराया.. अशी म्हणारी सहर शेख महापालिका निवडणूकीनंतर खूप प्रसिद्ध झाली आहे. त्यांचे ‘मुंब्य्राला हिरवा करुन टाकू’ या वक्तव्यामुळे त्या अधिक ट्रोल झाल्याचे दिसून आले. नुकतेच वारीस पठाण यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा शहरातून एमआयएमचे पाच उमेदवार निवडून आले. यात, सहर शेख यांचा देखील समावेश आहे. सहर शेख या जितेंद्र आव्हाड यांचा एकेकाळी निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या यूनुस शेख यांची मुलगी आहे. सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा भागात ब्लाॅक अध्यक्ष म्हणून काम करत होते. मध्यंतरीच्या काळात आव्हाड आणि युनूस यांचे जमेनासे झाले होते. त्यामुळे सहर विजयी झाल्यानंतर यूनुस शेख यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली होती.
तर, सहर यांनी देखील त्यांच्या भाषणात ‘पुढच्या निवडणूकीत संपूर्ण मुंब्य्राला हिरवा करुन टाकू’ असे वक्तव्य केले. तर, ‘कैसे हराया…’ असे म्हणत आव्हाडांना डिवचले होते. या वक्तव्यावरुन सहर या समाजमाध्यमांवर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्याचे क्लिप सर्वत्र पसरले होते. त्यानंतरही त्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया ठामपणे मांडली. त्यामुळे सहर शेख हे नाव सध्या राजकारणात चांगलेच गाजले आहे.
नुकतेच एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते माजी आमदार वारिस पठाण यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर सहर शेख आणि त्यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरुन राजकीय वर्तूळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये नक्की काय ?
वारीस पठाण यांनी फेसबुकवर सहर आणि त्यांचा फोटो पोस्ट केला असून त्यावर “कैसा हराया”हैदराबाद विमानतळावर एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते माजी आमदार वारिस पठाण आणि मुंब्य्राचे नगरसेवक सहर शेख, असे लिहिले आहे.

