लोकसत्ता खास प्रतिनिधी डोंबिवली: येथील एमआयडीसीतील मुख्य वर्दळीच्या रस्ते, सोसायटी, बंगल्यांच्या प्रवेशव्दारावर राडारोडा रात्रीच्या वेळेत आणून टाकण्याचे प्रमाण वाढल्याने एमआयडीसीतील रहिवासी संतप्त आहेत. एकीकडे संथगती काँक्रीट रस्त्यांनी रहिवासी हैराण असताना आता काही अज्ञात व्यक्ति मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर राडारोडा आणून टाकत असल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संबंधिताचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. सुदर्शननगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. पदपथ, पाण्याच्या वाहिन्या, संथगती कामे यामुळे या भागातील रहिवाशी हैराण आहेत. याच भागातील काही रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळेत नागरिकांना अंधारातून येजा करावी लागते. हा त्रास सहन करत असताना काही अज्ञात व्यक्ति रात्रीच्या वेळेत टेम्पोने इमारत, घरातील लाद्या, सिमेंट तुकड्यांचा राडारोडा एमआयडीसीतील रस्ते, सोसायट्यांची प्रवेशव्दार, गटारांवर आणून टाकत आहेत. आणखी वाचा-नेवाळी नाका कारवाई: कल्याण पूर्वेतील नेवाळी नाका परिसरातील बेकायदा बांधकामे भुईसपाट शनिवारी सुदर्शननगर मधील श्री मंजुनाथ सोसायटीच्या प्रवेशव्दारावर अज्ञात व्यक्तिने टेम्पोतून राडारोडा आणून सोसायटीच्या प्रवेशव्दारावर आणून टाकला आहे. या राडारोड्याची धूळ वारा आला की परिसरात पसरते. पाऊस सुरू होईल त्यावेळी राडारोड्याचा चिखल परिसरात पसरुन या रस्त्यावरुन चालणे मुश्किल होईल, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. श्री मंजुनाथ सोसायटीतील रहिवाशांनी हा राडारोडा तात्काळ उचलण्याची मागणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे एमआयडीसी हद्दीतील गटारे, रस्ते याकडे लक्ष नसल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.