ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानंतर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी शहरातील अतिधोकादायक इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याची कारवाई शनिवारपासून सुरू केली आहे. सर्व सहाय्यक आयुक्त त्यांच्या विभागातील अतिधोकादायक आणि धोकादायक अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगत आहेत.

मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीने मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले निर्देश, तसेच लोकप्रतिनिधी, नागरिकांनी केलेल्या तक्रारी या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी -१ वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारतीत नागरिक राहत आहेत. या सर्व इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनिःसारण जोडणी तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, असे आदेश आयुक्त राव यांनी दिले. इमारत अतिधोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने घोषित केल्यानंतरही अशा इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करीत असून पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून आयुक्तांनी असे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पालिका प्रशासनाने शनिवार सकाळपासून कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील इंडो अमायन्स कंपनी प्रशासनावर गुन्हा; सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनी कामगारांना देणी मिळण्याचा मार्ग मोकळा?

नौपाडा आणि कोपरीत एकूण ६७ धोकादायक इमारती आहेत. पैकी ३८ इमारती आता रिक्त करण्यात आल्या आहेत. २७ इमारती रिकाम्या करुन त्यावर कारवाई करण्याचे प्रभाग समितीने निश्चित केले आहे. यात कोपरी येथील दौलत नगर भागातील १४ इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. या इमारतींची पालिकेच्या पथकाने पाहणी करून तेथील रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन केले. तसेच या इमारतींचा तसेच नौपाड्यातील १२ इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याची कारवाई करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. पालिकेच्या इतर प्रभाग समिती हद्दीतही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येत आहे, असे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.