रहिवाशांना नव्याने पाणी देयके; ऑनलाइन भरण्याची सोय; तक्रारींचा निपटारा साहाय्यक आयुक्त स्तरावर
ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्टय़ांचा परिसर वगळता इमारतींना सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार आकारण्यात आलेल्या चुकीच्या पाणी बिलांमध्ये ठाणे महापालिकेने अखेर दुरुस्ती केली असून ग्राहकांना नव्याने पाणी बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. हे करीत असताना मालमत्ता कराच्या धर्तीवर ठाणेकरांना यंदाच्या वर्षांपासून पाणी बिलेही ऑनलाइन पद्धतीने भरता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची बिले भरण्यासंबंधी सुरू असलेला घोळ लक्षात घेता यासंबंधी तक्रारींचा निपटारा करण्याचे अधिकार सहायक आयुक्त स्तरावर सोपविण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यामुळे तक्रारदारांना यापुढे महापालिका मुख्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत, असा दावा केला जात आहे.




ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून पाणीपट्टीची रक्कम सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार वसूल करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयाची महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीपासून अंमलबाजवणी सुरू केली आहे. मात्र काही बिलांमध्ये घरांचे क्षेत्रफळ चुकीचे असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. तत्कालीन महापौर संजय मोरे यांनीही जुन्या पद्धतीनेच पाणी बिलांची आकारणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सदनिकांच्या क्षेत्रफळानुसारच पाणीपट्टी वसूल केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्याच वेळी पाणीपुरवठा विभागाकडे देण्यात आलेले पाणी बिलांचे काम पुन्हा मालमत्ता कर विभागाकडे देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता.
मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा विभागातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला पाणी बिलातील घोळ आता दूर होऊ लागला असून योग्य क्षेत्रफळानुसार नव्याने पाणी बिलांची आकारणी केली जात असल्याचा दावा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना केला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फतच ही बिले पाठविण्यात येत आहेत. असे असले तरी येत्या पंधरा दिवसांत ज्या ग्राहकांपर्यंत पाणी बिले पोहोचणार नाहीत अशा ग्राहकांना प्रभाग समितीमधील नागरी सेवा केंद्रामधून बिलांची अतिरिक्त प्रत उपलब्ध करून देण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नळजोडणीधारकांची माहिती संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध नव्हती. त्यामुळे ऑनलाइनद्वारे ग्राहकांना पाणी बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाला शक्य होत नव्हते. मात्र अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली तर पाणी बिलांमध्ये वाढ होऊ शकेल, या उद्देशातून महापालिकेने यंदाच्या वर्षीपासून ग्राहकांना ऑनलाइनद्वारे पाणी बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच सर्वच प्रभाग समित्यांमध्येही ऑनलाइनद्वारे बिले स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय, ग्राहकांना पाणी बिलांची रक्कम बँकांमधूनही भरता यावी यासाठी काही बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. त्यापैकी इण्डसइंड बँकेत ग्राहकांना पाणी बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.