scorecardresearch

उन्हाळय़ात पाणीसंकट नाही?; बारवी धरणात ५५ टक्के पाणीसाठा; पुढील दोन महिने पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य

ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामधील निम्म्याहून अधिक नागरी तसेच औद्योगिक भागाला दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५४.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यापासून लागू होणारी पाणीकपात तूर्तास तरी टळली आहे.

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामधील निम्म्याहून अधिक नागरी तसेच औद्योगिक भागाला दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ५४.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून यामुळे दरवर्षी जानेवारी महिन्यापासून लागू होणारी पाणीकपात तूर्तास तरी टळली आहे. तसेच धरण क्षेत्रात आजही ५० टक्क्याहून अधिक पाणी साठा शिल्लक असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांत पाणीटंचाई जाणवणार नाही, असा दावा सूत्रांनी केला आहे.

बारवी धरणातून कल्याण डोंबिवली पालिका, एमआयडीसी, २७ गावे, बदलापूर-अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबई, ठाणे पालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा, तळोजा औद्योगिक क्षेत्र, मीरा-भाईंदर शहरांना दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून दररोज सुमारे नऊशे ते अकराशे दशलक्ष लिटर पाणी वितरण केले जाते. दरवर्षी १५ जूनपर्यंत पुरेल इतक्या धरणातील पाणी साठय़ाचे नियोजन करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणीकपात लागू करण्यात येते. यामुळे शहरांचा आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. पाऊस सुरू होईपर्यंत ही कपात लागू असते. परंतु मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

 बारवी धरणातून पाणी वितरण करण्याची जबाबदारी एमआयडीसीची असली तरी पाणीकपात आणि शहराला पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण ठरविण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. या विभागाकडून पाणी कपातीसंदर्भात कोणत्याही सूचना एमआयडीसीला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्यातरी पाणीकपातीची कोणतीही चिन्हे नाहीत, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

निर्णय पाटबंधारे विभागाच्या हाती

 टाटा समूहाचे भिवपुरी येथील आंद्र धरण आणि बारवी धरणात मार्च ते जुलै अखेपर्यंत (पाऊस पडेपर्यंत) किती पाणी साठा असेल. दैनंदिन पाणी उपशाचे प्रमाण, वाढत्या तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन याचे मूल्यांकन पाटबंधारे विभागाकडून केले जाते. त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाकडून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येतो. अद्याप तरी पाणीकपातीचा कोणताही आदेश या विभागाकडून आलेला नाही, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

धरण साठवण क्षमता

 बारवी धरणाची साठवण क्षमता ३३८.८४ दशलक्ष लीटर मीटर आहे. धरम्णात सध्या १८५ दशलक्ष मीटर पाणी साठा आहे. धरणाची उंची सात मीटरने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे धरणाचे माघार पाणलोट क्षेत्र मुरबाड तालुक्यातील तोंडली गाव परिसरातील आदिवासी पाडय़ांपर्यंत गेले आहे.

बारवी धरणात ५४.८६ टक्के पाणीसाठा आहे. तो मुबलक आहे. पुरवठय़ाचे नियोजन एमआयडीसी करते. पाणीकपातीचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेतला जातो. अ्द्याप तरी पाणीकपातीसंदर्भात पाटबंधारे विभागाचे आदेश नाहीत.

– दुष्यंत उईके, कार्यकारी अभियंता बारवी धरण प्रकल्प.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water crisis summer water storage adequate water supply possible ysh

ताज्या बातम्या