ठाणे : कळवा शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कळवा येथील पारसिकनगर भागात जलवाहिनी टाकण्यासाठी २ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी नगरविकास विभागाकडून महापालिकेस मंजूर झाला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत शहरातील नागरिकांना पाणीटंचाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

कळवा शहरात मोठय़ा प्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. या भागात लोकसंख्येच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. येथील पाणीटंचाई सोडविण्यासाठी कळवा-मुंब्रा आणि दिवा भागातून गेलेली ४० वर्षे जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. अनेकदा त्यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागतो. मे २०२२ पर्यंत ही जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. कळवा भागातील पारसिकनगर येथे नवीन जलवाहिनी टाकण्याकरिता महापालिकेकडे निधीची कमतरता होती. त्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यास नगरविकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.