देवाण-घेवाणीतून जलसमृद्धी

ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी तात्काळ स्वरूपाच्या तसेच २०५० पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी दीर्घकालीन स्वरूपाच्या कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याची चाचपणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी नवा आराखडय़ात संकल्प

नव्या स्रोतांसह शहरांचे पाणी वळविण्याच्या विविध उपाययोजनांवर चाचपणी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी तात्काळ स्वरूपाच्या तसेच २०५० पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी दीर्घकालीन स्वरूपाच्या कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याची चाचपणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी जलनियोजनाचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई शहरांना इतर स्रोतांमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार असून या शहरांना सध्या पाणीपुरवठा करत असलेल्या स्रोतांचे पाणी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर शहरांना वळविण्याचा विचार केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा कृती दलाची स्थापना केली होती. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची बैठक नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली होती. त्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील २०५० पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आराखडा तयार करून तो सादर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले होते. याशिवाय मराठवाडा वॉटर ग्रीडप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील धरणांचा वॉटर ग्रीड करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केली होती. तीन आठवडय़ानंतर कृती दलाची बैठक पुन्हा होणार असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा पाणी आराखडा सादर करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

जिल्हा प्रशासनाची चाचपणी

  • ठाणे जिल्ह्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार केला जात आहे.
  • तात्काळ उपाययोजनांमध्ये महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून र्निजतुक केलेल्या पाण्याचा वाहन धुणे, शौचालयामध्ये वापर करण्याचा विचार सुरू आहे.
  • पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातून मीरा-भाईंदरला ५० टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून येत्या दोन वर्षांत मीरा-भाईंदरला पाणी मिळेल अशी शक्यता आहे.
  • नवी मुंबई शहराला खोपोली येथील गगनगिरी महाराज मठाजवळील बंधाऱ्यातून तसेच रायगडमधील एका धरणातून पाणीपुरवठा होणार आहे.
  • मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई शहराला नव्या स्रोतांमार्फत पाणीपुरवठा मिळाल्यानंतर त्या शहरांमध्ये स्टेम, एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर शहरांना वळविण्याचा विचार आहे.
  • काळू धरणाच्या उभारणीसह खाडीचे खारे पाणी गोडे करता येऊ शकते का, याचाही विचार केला जाणार आहे.

डोंबिवलीसाठी जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव

एमआयडीसीच्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. या वाहिन्यांमधून कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे डोंबिवलीत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. या जलवाहिन्या बदलल्यास डोंबिवली शहरात योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल. त्याचाही प्रस्ताव आराखडय़ात देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water enrichment exchange ysh

ताज्या बातम्या