बांधकामांसाठीचे पाणी नागरी वस्त्यांकडे

ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला आहे.

ठाण्यातील पाणीटंचाईसंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे-पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय

ठाणे : ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच भागांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी शहरातील अधिकृत बांधकामांना देण्यात आलेल्या नळजोडण्यांचा पाणीपुरवठा कमी करून तो नागरी वस्त्यांकडे वळविण्यात यावा. तसेच शहरात बेकायदा बांधकामे उभारणीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तर, तो तातडीने बंद करावा, असा निर्णय कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात तीव्र टंचाई निर्माण होत आहे. या भागांमध्ये महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या सातत्याने फुटण्याचे प्रकार घडत आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी एक ते दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत असून त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. यामुळे या भागांमध्ये तीन ते चार दिवस पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय, नियमित मंजूर कोट्यानुसारही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. 

त्यामुळे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीला                   

 महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. ठाणे शहरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होताना दिसून येत नाही. त्यामुळे बांधकामांनाही पिण्याचेच पाणी वापरले जाते का किंवा इतर काही व्यवस्था आहे, असा प्रश्न शिवसेनेच्या नगरसेविका अनिता गौरी यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यावर येत्या दोन दिवसांत सर्वच ठिकाणी पाहणी करून माहिती घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापालिकेचे नगरअभियंता अर्जुन अहिरे यांनी दिले. त्यानंतर शहरातील अधिकृत बांधकामांना देण्यात आलेल्या नळजोडण्यांचा पाणीपुरवठा कमी करून तो नागरी वस्त्यांकडे वळविण्यात यावा. तसेच शहरात बेकायदा बांधकामे उभारणीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तर, तो तातडीने बंद करावा, अशा स्पष्ट सूचना खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोट्यानुसार पाणीपुरवठा

कळव्याला ३५ दशलक्ष लिटर, मुंब्य्राला ५२ दशलक्ष लिटर आणि दिव्याला ३७ दशलक्ष लिटर पाण्याचा मंजूर कोटा आहे. तरीही कळव्याला ५, मुंब्य्राला ४ आणि दिव्याला ३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असल्याचा दावा नगरसेवकांनी केला. त्यानंतर मंजूर कोट्यानुसार पाणी देण्याची सूचना खासदार शिंदे आणि आयुक्त शर्मा यांनी एमआयडीसीकडे केली. तर याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

‘पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे प्रमाण कमी करा’

अंबरनाथ येथील पालेगाव ते शिळफाट्यापर्यंत जलवाहिन्या बदलण्याचे काम एमआयडीसीमार्फत सुरू आहे. यामध्ये ३२ ठिकाणी जलवाहिनीच्या जोडणीची कामे करावी लागणार असून त्यासाठी प्रत्येकवेळी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. तसेच ही कामे मे महिनाअखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. परंतु प्रत्येक वेळी पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे प्रमाण कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच ही सर्व कामे मे महिन्याऐवजी एप्रिल महिन्यातच पूर्ण कशी करता येईल, याचे नियोजन करण्याची सूचना खासदार शिंदे यांनी यावेळी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water for construction to urban areas akp

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या