बदलापूरः बदलापूर शहरात जून महिन्यात जलशुद्धीकरण केंद्रात तब्बल ३४ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात महावितरणाकडून सुरू असलेल्या लपंडावाची नोंद ठेवली असून त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते आहे. विजेच्या लपंडावामुळे सध्या १५ ते २० टक्के पाणी उचल कमी झाल्याचेही प्राधिकरणाने कबूल केले आहे. शहराच्या विविध भागातील जलकुंभांमध्ये पाण्याची पातळी राखली जात नसल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. पाणी असूनही यंत्रणा सुरळीत नसल्याने शहरात पाणी असूनही टंचाईसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणाच्या कारभाराप्रती संतापाचे वातावरण आहे.
महावितरणाच्या कारभारामुळे सद्या बदलापुरकर त्रस्त झाले आहेत. सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करत असून त्यामुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्थाही प्रभावीत झाली आहे. सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम पहायला मिळतो आहे. काही तासांच्या फरकाने पाच सेकंदापासून ते काही तासांपर्यंत वीज पुरवठा खंडीत होत असतो.
गेल्या दोन महिन्यांमध्ये बदलापूर शहरात तब्बल ३४ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या खरवई येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि बॅरेज येथील पाणी उचल केंद्रांमध्ये जून महिन्यात खंडीत वीज पुरवठ्याच्या नोंदी ठेवल्या गेल्या.
१८ आणि ५ दशलक्ष लीटर क्षमतेच्या एका आणि मुख्य २४ दशलक्ष लीटरच्या दुसऱ्या प्रक्रिया केंद्रात वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या या नोंदी आहेत. खरवई केंद्रात जून महिन्यात तब्बल ३४ तास वीज पुरवठा खंडीत झाला होता, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता सुरेश खाद्री यांनी दिली आहे. तर त्याचवेळी बॅरेज केंद्रातही २१ तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाणी प्रक्रिया केंद्रातील यंत्रणा सातत्याने बंद पडते. वीज गेल्यानंतर ही यंत्रणा बंद करावी लागते. तर वीज आल्यानंतरही ही यंत्रणा सुरू होण्यासाठी १० ते ३० मिनीटापर्यंतचा वेळ जातो. त्यामुळे दिवसात चा ते पाच वेळा जरी वीज पुरवठा खंडीत झाला तरी तितकाच वेळ यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी लागत असतो.
या काळात पाण्याची प्रक्रिया बंद होत असल्याने त्याचा शहरातल्या विविध भागातल्या पाणी पुरवठ्यावर थेट परिणाम होतो. परिणामी जलकुंभांमध्ये पाण्याची पातळी गाठली जात नाही. त्यामुळे त्या त्या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असतो. यातही उंच भागातील इमारतींना आणि जलवाहिन्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भर पावसातही काही भागात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. तर सर्वसामान्यांनाही अशाच प्रकारे खंडीत वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिका
सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पाणी प्रक्रिया केंद्र बंद होत असते. ही प्रक्रिया पूर्ववत होण्याची मोठा वेळ खर्ची होत असतो. त्यामुळे अनेकदा पाण्याची पातळी गाठण्यात अपयश येते. त्यामुळे पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी अखंडीत वीज आवश्यक आहे. – सुरेश खाद्री, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
महावितरणाची भूमिका
आनंद नगर येथील ५० मेगाव्हॅट क्षमतेचा रोहित्र नादुरूस्त झाल्याने मोरिवली येथून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. त्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे गेल्या महिन्यात अनेकदा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. पर्यायी वाहिनीची तयारी सुरू आहे. लवकरच त्यावर समाधान मिळेल, असे महावितरणाचे आधिकारी सातत्याने सांगत आहेत.